कोयनेसह पश्चिमेकडील सर्वच तालुक्यात संततधार
पाटण तालुक्यातील कोयना धरणांतर्गत विभागासह जिल्ह्यातील पश्चिमेकडील सर्वच तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी १७,२५६ क्युसेक्स इतक्या पाण्याची आवक होत आहे. जून महिन्यात तब्बल तीस दिवसात केवळ एक टीएमसी पाण्याची आवक झाली होती. मात्र मागील चोवीस तासांत १.४१ टीएमसी पाण्याची आवक झाली असून पाणीपातळीत ४ फूट नऊ इंचांनी वाढ झाली आहे. धरणात सध्या एकूण १६.४५ टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून त्यापैकी उपयुक्त साठा ११.४५ टी. एम. सी. इतका आहे.दरम्यान, पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पेरणी व टोकाणीच्या कामांना गती आली आहे.
कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी सर्वच ठिकाणी पावसाची संततधार सुरूवात झाली आहे. सध्या जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यातील बहुतांशी भागात अपेक्षित पाऊस पडत असल्याने कोयनेसह अंतर्गत छोट्या, मोठ्या नद्या, नाले, ओढ्यांच्या पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. तसेच पावसाने पाठ फिरवली होती, त्यामुळे खरीपाच्यापेरण्या व टोकाणीच्या कामे ठप्प झाली होती. मात्र आता पावसाने दमदार हजेरी लावल्यान या कामांनागती मिळाली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.