गणेशोत्सवात फुले, मिठाईच्या दरावर नियंत्रण ठेवा; गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी, यंदा तरी अंमलबजावणीची अपेक्षा

गणेशोत्सव काळात फुलं, मिठाईचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा, अशी मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने राज्य सरकारकडे केली आहे.
गणेशोत्सवात फुले, मिठाईच्या दरावर नियंत्रण ठेवा; गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी, यंदा तरी अंमलबजावणीची अपेक्षा
Published on

मुंबई : गणेशोत्सव काळात फुले, मिठाईचे दर अव्वाच्या सवा आकारले जातात. आधीच महागाईमुळे सामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात फुलं, मिठाईचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा, अशी मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने राज्य सरकारकडे केली आहे. बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी ही मागणी केली आहे.

“गेल्या काही वर्षांपासून महागाई आग ओकत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सणासुदीच्या काळात तर महागाईचा उच्चांक गाठला जातो. पुढील दोन महिन्यांवर लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून दोन लाखांहून अधिक घराघरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. वाढती महागाई लक्षात घेता, गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात फुलं, मिठाईचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा, जेणेकरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व गणेशभक्तांना दिलासा मिळेल. या गंभीर प्रश्नी राज्य सरकारशी याआधी चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी राज्य सरकारने आश्वासन दिले होते, मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तरी यंदाच्या गणेशोत्सवापासून फुलं, मिठाईचे दर नियंत्रणासाठी योग्य ते पाऊल उचलावे,” अशी मागणी दहिबावकर यांनी केली आहे.

यंदा ७ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असून १७ सप्टेंबर रोजी बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सव मंडळ आणि घराघरात प्रतिष्ठापना करण्यासाठी भक्तांची आतापासून लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या १० दिवसांत भक्तांना उत्साहात गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी फुलं, मिठाईचे दर नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

मावा, मिठाईची तपासणी करावी

विशेष म्हणजे फुले ही नाशिवंत असल्याने त्यावर ड्युटी लागत नाही. तरीही ऐन गणेशोत्सवात फुलांच्या किमतीत वाढ केली जाते. तसेच गुजरातवरून येणारा मावा हा दादर स्टेशन, मुंबई सेंट्रल येथे गाड्यातून उतरवल्यावर फलाटावर काही काळ पडलेला असतो. स्थानकात असलेल्या घुशी, उंदरांमुळे मिठाई खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने मावा, मिठाईची तपासणी करावी, अशी मागणीही दहिबावकर यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in