
पुण्यातील जगप्रसिद्ध संस्था FTII पुन्हा चर्चेत आहे. लॉ कॉलेज रोडवर असलेल्या FTII संस्थेत विद्यार्थी संघटनांकडून वादग्रस्त बॅनरबाजी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या संस्थेत 'रिमेम्बर बाबरी- डेथ ऑफ कॉन्स्टिट्युशन' अशा आशयाचे बॅनर झळकले, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे बॅनर झळकल्याचे समजताच हिंदुत्त्ववादी संघटनांनी तात्काळ FTII च्या कॅम्पसमध्ये धाव घेतली. यानंतर या कार्यकर्त्यांकडून हे बॅनर फाडून जाळण्यात आले. तसेच, हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी बॅनर लावणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी फौजफाटा तैनात केला आहे. तसेच, घडलेल्या प्रकाराविषयी चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपायुक्तांनी दिले आहे.