
पुणे : इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांच्या व्याख्यानादरम्यान हिंदू देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधील प्राध्यापक अशोक सोपान ढोले यांना पुणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांच्याविरोधात धार्मिक भावनांचा अपमान करून त्यांना ठेच पोहोचवण्याच्या आयपीसी कलम २९५ (अ )नुसार डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राध्यापक अशोक ढोले यांचा हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन देवांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पुणे येथील हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र दिलीप पडवळ यांनी प्राध्यापकाविरुद्ध रितसर तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांनी दिली. अभाविपच्या कार्यकर्त्यांनीही या प्राध्यापकावर संताप व्यक्त केला.
या घटनेमुळे भाषणस्वातंत्र्य आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आदराचे वातावरण राखण्याची शिक्षकांची जबाबदारी, याबाबत वादाला तोंड फुटले आहे.
अशोक ढोले यांना तडकाफडकी निलंबित
कॉलेज प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेत प्राध्यापक अशोक ढोले यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्राचार्य ऋषिकेश सोमण यांनी सांगितले की, ही घटना त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. निलंबनापूर्वी हे प्राध्यापक १८ वर्षांपासून या महाविद्यालयाशी संबंधित होते. प्राध्यापकांच्या वक्तव्याचा संपूर्ण संदर्भ समजून घेण्यासाठी महाविद्यालयाने एक चौकशी समिती स्थापन केली आहे.