वडेट्टीवार आणि आत्राम यांच्यात जुंपली; वडेट्टीवार म्हणतात, आत्राम यांची नार्को टेस्ट करा

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी व महायुती यांच्या नेत्यांनी आपली ताकद लावली असून आत्राम आणि वडेट्टीवार यांच्यात दावे-प्रतिदावे रंगत आहेत. अशात वडेट्टीवार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या आत्राम यांच्या दाव्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे.
वडेट्टीवार आणि आत्राम यांच्यात जुंपली; वडेट्टीवार म्हणतात, आत्राम यांची नार्को टेस्ट करा

गडचिरोली : महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये लवकरच प्रवेश करतील, असा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. मुळात ऐन निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येत असतानाच हा दावा करण्यात आल्याने या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र यासंबंधात स्वत: विजय वडेट्टीवार यांनी इन्कार केला आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी व महायुती यांच्या नेत्यांनी आपली ताकद लावली असून आत्राम आणि वडेट्टीवार यांच्यात दावे-प्रतिदावे रंगत आहेत. अशात वडेट्टीवार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या आत्राम यांच्या दाव्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे.

आत्राम यांनी या संबंधात सांगितले की, वडेट्टीवार यांच्या भाजपा प्रवेशासंबंधातील बैठकीत आपणही उपस्थित होतो. आता आत्राम यांच्या या दाव्याला वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आत्राम यांची नाक्रो टेस्ट करा असे सांगत वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे.

पराभव झाला तर मंत्रिपद जाईल, अशी भीती आत्राम यांना वाटत असल्याने ते आपल्याला त्रास देण्यासाठी असे काहीही दावे करीत आहेत. ते जर त्या बैठकीला उपस्थित होते तर त्यांची नार्को टेस्ट करावी, त्यातून सत्य काय ते बाहेर पडेल. आत्राम यांनी आधी स्वत:च्या मतदारसंघातून भाजपला अधिक मते मिळवून आघाडी मिळवून दाखवावी, असे आव्हानही वडेट्टीवार यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in