मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमावरून वाद; मुख्यमंत्र्यांवर 'हा' आरोप

गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमावरून वाद; मुख्यमंत्र्यांवर 'हा' आरोप

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने शनिवारी औरंगाबाद, नांदेडमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर दुसरीकडे हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने हैदराबादमध्येही राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र, या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी औरंगाबादमधील शासकीय कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे सकाळी नऊऐवजी सात वाजताच घाईघाईत आटोपण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैदराबादमधील कार्यक्रमासाठी रवाना झाले. तेथे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे वाद निर्माण झाला असून दिल्लीच्या लांगुलचालनासाठी मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम घाईघाईत उरकल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा ध्वजारोहण करण्यात आले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने यंदाही कार्यक्रम आयोजित केला होता. औरंगाबादमधील विजयस्तंभाजवळ सकाळी सातच्या सुमारास ध्वजारोहण करण्यात आले. त्यावरून शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांवर टीकास्र सोडण्यात आले आहे. “मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. एकनाथ शिंदे दिल्लीच्या पातशहांच्या आदेशावरून निर्णय घेतात आणि त्यांच्या आदेशावरूनच हैदराबादला धाव घेत आहेत”, अशा शब्दांत शिवसेनेचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले.

मुख्यमंत्र्यांनंतर शिवसेनेने पुन्हा केले ध्वजारोहण

मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम कार्यक्रमाची वेळ बदलल्याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून पुन्हा एकदा सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

हा चटावरचे श्राद्ध उरकण्याचा प्रकार - दानवे

“याला चटावरचे श्राद्ध उरकणे म्हणतात. म्हणजे ना श्राद्धाचे जेवलेही जात नाही आणि ज्याला पोहोच व्हायचे त्याला पोहोचही होत नाही. म्हणजे त्याला कावळाही शिवत नाही, अशा पद्धतीने आटोपला गेलेला हा कार्यक्रम आहे. त्यामुळे शिवसेनेने रीतसर नऊ वाजता हा कार्यक्रम केला आहे”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in