नौदल दिनी पंतप्रधानांच्या दौऱ्यात भ्रष्टाचार; साडेपाच कोटींच्या घोटाळ्याचा वैभव नाईक यांचा दावा, हायकोर्टात याचिका करणार दाखल

नौदल दिन आणि पुतळा प्रकरण यावर नौदल काहीच बोलत नाही आणि म्हणूनच यामागील सत्य काय आहे? हे जनतेसमोर आणण्यासाठी मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयात नौदल, जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन यांच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे.
नौदल दिनी पंतप्रधानांच्या दौऱ्यात भ्रष्टाचार; साडेपाच कोटींच्या घोटाळ्याचा वैभव नाईक यांचा दावा, हायकोर्टात याचिका करणार दाखल
Published on

राजन चव्हाण/कुडाळ : मालवणला ४ डिसेंबर २०२३ रोजी झालेला नौदल दिन आणि पंतप्रधान दौऱ्याचा संपूर्ण खर्च नौदलाने केला असताना तो जिल्हा नियोजन निधीतून केल्याचे दाखवून सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उबाठा) आमदार वैभव नाईक यांनी रविवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केला. या भ्रष्टाचारप्रकरणी आपण लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

भ्रष्टाचारातून मिळालेला हा पैसा लोकसभा निवडणुकीत मतदारांना वाटण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. पंतप्रधानांची कार, अन्य शासकीय वाहने व हेलिकॉप्टरच्या इंधनासाठी ३८ लाख रुपये खर्च दाखवण्यात आल्याची माहिती नाईक यांनी दिली.

नौदल दिनाच्या निमित्त पंतप्रधानांचा मालवण दौरा, पुतळा अनावरण, सुरक्षा व्यवस्था, मंडप व्यवस्था, निवास व भोजन व्यवस्था आदी खर्च नौदलाने केला आहे, अशी आमची माहिती आहे. तरीही सर्व खर्च जिल्हा नियोजनमधून 'विशेष बाब' म्हणून शासनाची मंजुरी घेऊन खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याबाबतची कागदपत्रे आमदार नाईक यांनी पुरावा म्हणून दाखवली. त्यानुसार नौदल दिन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण यावर ५ कोटी ५४ लाख ३५ हजार रुपये जिल्हा नियोजन निधीतून खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहेत.

नौदल दिन आणि पुतळा प्रकरण यावर नौदल काहीच बोलत नाही आणि म्हणूनच यामागील सत्य काय आहे? हे जनतेसमोर आणण्यासाठी मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयात नौदल, जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन यांच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे.

या कार्यक्रमाच्या 'मंडपा'वर दोन कोटी रुपये, 'बॅरिकेटिंग'साठी दीड कोटी, इंटरनेट, वायरलेस, टेलिफोन, पाणीपुरवठा, ओळखपत्र छपाई अन्य खर्च १८ लाख ५० हजार दाखवला आहे. हा भ्रष्टाचार असल्याचा आरोप आमदार नाईक यांनी केला आहे.

नाईक पुढे म्हणाले की, पुतळा आणि त्याच्या परिसरातील सुशोभिकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे हे आता उघड झाले आहे. यावर आतापर्यंत कोणीच काही बोलत नाही. पुतळा बनवण्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च दाखवला असला तरी पुतळा बनवण्यासाठी आपल्याला २६ लाख रुपये मिळाले, अशा आशयाचे निवेदन शिल्पकार जयदीप आपटे यांनी अटकेनंतर पोलिसांना दिल्याची आमची माहिती आहे. हे जर खरे असेल तर उर्वरीत दोन ते सव्वा दोन कोटी रुपये कोणी घेतले...? शिवाय पुतळ्याच्या परिसरात जे सुशोभिकरण झाले आहे, त्याच्या कामातही भ्रष्टाचार झाला आहे हे उघड झाले आहे, असा आरोप नाईक यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in