कफ सिरप साठ्याचा शोध सुरू; विक्रेते, वितरक व रुग्णालयांची झाडाझडती

मध्यप्रदेश, राजस्थान याठिकाणी कफ सिरप या औषधाच्या सेवनामुळे बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात औषधात डायइथिलीन ग्लायकोल या विषारी घटकाचा समावेश आहे का?, याची तपासणी अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केली आहे.
कफ सिरप साठ्याचा शोध सुरू; विक्रेते, वितरक व रुग्णालयांची झाडाझडती
Published on

मुंबई : मध्यप्रदेश, राजस्थान याठिकाणी कफ सिरप या औषधाच्या सेवनामुळे बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात औषधात डायइथिलीन ग्लायकोल या विषारी घटकाचा समावेश आहे का?, याची तपासणी अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केली आहे. यासाठी विक्रेते, वितरण करणारे व रुग्णालयात तपासणी करण्यात येणार असून विषारी कफ सिरपचा साठा आढळल्यास तो संपूर्ण नष्ट करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत.

मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये कफ सिरप औषधाच्या वापरामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या बाबत महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. कोल्ड्रिफ सिरप, समूह क्रःएस आर १३ (कोल्डिफ सिरप बॅच नंबर एस आर १३) निर्मिती मे-२०२५, कालबाह्यता एप्रिल २०२७, हे औषध मे. बेसन फार्मा, कांचीपुरम जिल्हा, तामिळनाडू यांच्याद्वारे उत्पादित केलेले असून त्यामध्ये डायइथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक मिसळलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्वसामान्य जनता यांनी तत्काळ या औषधाचा वापर थांबवावा. जर हे औषध कोणाकडे उपलब्ध असेल, तर ते जवळच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयास त्वरित कळवावे. किंवा थेट अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी, असे सांगण्यात आले.

डॉक्टरांच्या चिठ्ठीविना कफ सिरपची विक्री!

महाराष्ट्रात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप औषध दिले जात असल्याचे ऑल इंडिया फूड अँड ड्रग्ज असोसिएशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in