
मुंबई : एल्गार परिषद-माओवादी लिंक प्रकरणातील आरोपी कार्यकर्ते रमेश गायचोर यांना अखेर तात्पुरत्या जामिनावर तुरुंगातून सोडण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिल्यानतरही गायचोर यांची तुरुंगातून सुटका केली नव्हती. त्यावर बुधवारी उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत सरकार आणि तुरुंग प्रशासनाची कानउघाडणी केली होती. त्यानंतर गायचोर यांची तुरुंगातून सुटका केल्याची माहिती सरकारी वकिलांनी गुरुवारी न्यायालयाला दिली. याचवेळी आधीच्या न्यायालयीन आदेशाचे पालन न केल्याबद्दल बिनशर्त माफीही मागण्यात आली.
एल्गार परिषदेतील कथित सहभागाच्या आरोपाखाली रमेश गायचोर यांना अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यावरून बुधवारी खंडपीठाने राज्य सरकार आणि तुरुंग प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला होता. न्यायालयाच्या आदेशाचे तातडीने पालन न केल्यास कारवाईचा इशारा दिला होता.
प्रकरण काय?
वडिलांची प्रकृती ठीक नसल्याच्या कारणावरून गायचोर यांनी न्यायालयाला तात्पुरत्या जामिनासाठी विनंती केली होती. उच्च न्यायालयाने २६ ऑगस्ट २०२५ रोजी गायचोर यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून तीन दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केला आणि त्यांच्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी मुभा दिली. मात्र त्या आदेशाला अनुसरून गायचोर यांची तुरुंगातून सुटका केली नसल्याचे न्या. अजय गडकरी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाच्या निदर्शनास आले.