ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग संबंधित जागा सील करण्याचे कोर्टाचे आदेश

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग संबंधित जागा सील करण्याचे कोर्टाचे आदेश

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम अखेर सोमवारी संपले. सर्वेक्षणाच्या शेवटच्या दिवशी टीमने नंदीच्या मूर्तीसमोर असलेल्या विहिरीचे सर्वेक्षण केले. यात हिंदू पक्षाचे वकील विष्णु जैन यांनी विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. या दाव्यानंतर शिवलिंग सापडलेली जागा सील व सुरक्षित ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. दरम्यान, सर्वेक्षणासंबंधीचा अहवाल मंगळवारी न्यायालयात सादर केला जाणार आहे.

ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणाचा सोमवारी शेवटचा दिवस होता. मशिदीत सापडलेले शिवलिंग सुरक्षित ठेवण्यासाठी वकील हरिशंकर जैन यांनी वाराणसी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेतील मुद्द्यांवर अभ्यास केल्यानंतर खंडपीठाच्या मुख्य न्यायाधीशांनी याचिका स्वीकारली व प्रशासनाला शिवलिंग सापडलेली जागा त्वरित सील व संरक्षित करण्याचा आदेश दिला आहे.

कोर्टाने हरिशंकर जैन यांची याचिका दाखल करुन घेतल्यानंतर वाराणसीच्या जिल्हा दंडधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडलेआहे, ते ठिकाण तातडीने सील करा. तसेच तिथे कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यात येऊ नये. त्याचबरोबर वाराणसीचे जिल्हाधिकारी, पोलीस कमिशनर, सीआरपीएफ कमांडंट यांनी ते स्थान संरक्षित व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घ्यावी, असे आपल्या आदेशात कोर्टाने म्हटले आहे.

सील केलेल्या ठिकाणी प्रशासनाने सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्यात, त्याची जबाबदारी यूपी पोलीस व उत्तर प्रदेश सरकारचे मुख्य सचिवांची असेल. तसेच, हे आदेश तत्काळ लागू करण्यात यावेत व अधिकाऱ्यांनी त्याचे पालन करावे, असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, सर्वेक्षणाच्या काळात ज्ञानवापीच्या ५०० मीटर परिसरात सार्वजनिक प्रवेशास बंदी घालण्यात आली होती. तसेच चारही बाजूंनी येणाऱ्या रस्त्यांवर पोलिस-पीएसीचा कडक पहारा तैनात करण्यात आला आहे.

मुस्लीम पक्षाने दावा फेटाळला

दरम्यान, हिंदू पक्षाने शिवलिंग सापडल्याचा केलेला दावा मुस्लीम पक्षाने मात्र फेटाळला आहे. सर्व्हेदरम्यान काहीही सापडले नाही, असे मु्स्लीम पक्षाने म्हटले आहे. तसेच, ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेविरोधात कोर्टात जाणार असल्याचे मुस्लीम पक्षाने सांगितले.

वारिस पठाण यांचा आक्षेप

शिवलिंग सापडलेली जागा सील करण्याच्या आदेशाला एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे यावर आताच निष्कर्ष काढू शकत नाही, असे वारिस पठाण यांनी म्हटले आहे.

सापडलेले शिवलिंग

अंदाजे १२ फूट लांबीचे

मशिदीत असलेल्या तलावासारख्या विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्ञानवापी मशिदीजवळ असलेल्या वजूखान्याच्या तलाव व विहिरीत १२ फूट ८ इंच लांबीचे शिवलिंग सापडले आहे. या शिवलिंगाचे मुख नंदीच्या समोर आहे, असा दावा करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयात

आज सुनावणी

मुस्लीम पक्षाच्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अंजुमन इनाजानिया मस्जिद कमिटीने वाराणसी न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी यावर सुनावणी होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in