संजय राऊत मानहानी प्रकरण : नारायण राणेंना धक्का; समन्स रद्द करण्याचा अर्ज फेटाळला

खासदार आणि आमदारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने, भाजपचे खासदार नारायण राणे यांना दिलासा देण्यास नकार दिला.
संजय राऊत मानहानी प्रकरण : नारायण राणेंना धक्का; समन्स रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
Published on

मुंबई : खासदार आणि आमदारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने, भाजपचे खासदार नारायण राणे यांना दिलासा देण्यास नकार दिला. राणे यांनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयाने त्यांना बजावलेल्या समन्सविरोधात अर्ज दाखल केला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या तक्रारीच्या अनुषंगाने हा अर्ज केला होता.

१५ जानेवारी २०२३ रोजी भांडूप येथे झालेल्या कोकण महोत्सवात, राणे यांनी संजय राऊत यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. मी शिवसेनेत असताना माझ्यामुळेच संजय राऊत यांची राज्यसभेसाठी निवड झाली होती. त्यांच्या नावाची मतदान यादीत नोंदच नव्हती," असे राणे म्हणाले होते. राऊत यांच्या मते, ही वक्तव्ये केवळ त्यांची सार्वजनिक बदनामी करण्यासाठी करण्यात आली होती. न्यायालयाने राणेंना समन्स बजावले होते.

राणे यांनी ही प्रक्रिया आणि न्यायालयाच्या आदेशाला खासदार-आमदार न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांनी अर्जात म्हटले होते की, "ही तक्रार राजकीय हेतूने दाखल करण्यात आली असून, ती एकप्रकारे राजकीय विरोधकाला त्रास देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर होत आहे." मात्र, बुधवारी न्यायालयाने राणे यांचा हा अर्ज फेटाळला. त्यामुळे आता राणेंना माझगाव कोर्टात हजर राहावे लागण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in