अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. करुणा मुंडे (करुणा शर्मा) यांना धनंजय मुंडे यांच्या पहिली पत्नी म्हणून मान्य करत त्यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप अंशतः मान्य केले आहेत. आधीच वाल्मिक कराड प्रकरणात अडकल्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत असताना न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांना चांगलाच दणका मिळाला आहे.
करुणा मुंडे (करुणा शर्मा) यांनी त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत, असा दावा केला होता. त्यासाठी त्या कायदेशीर लढाई देत होत्या. आज या प्रकरणावर कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांच्या बाजूने निर्णय देत त्यांचा दावा मान्य केला आहे. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचे प्रकरण गेल्या तीन ते चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हे प्रकरण वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात होते.
कोण आहेत करुणा मुंडे (करुणा शर्मा) ?
करुणा मुंडे गेल्या तीन चार वर्षांपासून करुणा शर्मा या नावाने परिचित आहे. त्यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत असलेले संबंध आणि नंतर त्यांनी उघडपणे आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात याची मोठी चर्चा रंगली होती. करुणा शर्मा यांना आज न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या पत्नी म्हणून मान्यता दिली असली तरी त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर यापूर्वीच 'करुणा धनंजय मुंडे', असे त्यांचे नाव लिहिले आहे. त्यांच्या फेसबुकवरील माहितीनुसार, त्या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूर येथील असल्या तरी सध्या त्या मुंबईत राहतात. त्या मुंबईतील 'जीवनज्योत' या सामाजिक सेवा संस्थेशी संबंधित आहेत, असे त्यांनी फेसबुकवर लिहिले आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट लिहून करुणा आणि त्यांच्या संबंधांबद्दल माहिती दिली होती. 2021 पासून धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचे प्रकरण वेळोवेळी चर्चेत राहिले आहे.
काय आहे न्यायालयाचा निर्णय
करुणा यांनी आपल्याला धनंजय मुंडे यांची पत्नी म्हणून मान्यता मिळावी. तसेच आपल्याला आणि आपल्या मुलांना पोटगी मिळावी. याशिवाय त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे देखील आरोप केले होते. आजच्या निकालात न्यायालयाने करुणा यांना पहिली पत्नी म्हणून मान्यता दिली आहे. न्यायालयाने म्हटले आहे,
करुणा यांनी केलेले आरोप न्यायालयाने अंशतः मान्य केले
घरगुती हिंसाचार करू नये म्हणून धनंजय मुंडे यांना बजावलय
धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे (करुणा शर्मा) यांना महिन्याला दोन लाखांची पोटगी द्यावी
या खटल्याचा 25 हजार रुपयांचा खर्च देखील धनंजय मुंडे यांनी द्यावा
न्यायालयाच्या निकालानंतर करुणा यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, पोटगीबाबत त्या न्यायालयाच्या निकालावर असमाधानी आहे असे म्हणत किमान 15 लाख रुपये पोटगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.