गोहत्या, तर थेट मकोकाची कारवाई; मुख्यमंत्र्यांचा इशारा

गोहत्याप्रकरणी आता थेट मकोकाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रFPJ
Published on

मुंबई : गोहत्याप्रकरणी आता थेट मकोकाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. दरम्यान, विधानसभा सदस्य संग्राम जगताप यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नांवर फडणवीस यांनी उत्तर दिले.

श्रींगोदा तालुक्यातील ससाणे नगर येथे फटाके फोडण्यावरून झालेल्या हाणामारीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधीद्वारे संग्राम जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या परिसरातील कुरेशी आणि ससाणे कुटुंबामध्ये हाणामारी झाली होती. त्यामध्ये ससाणे कुटुंबातील एका व्यक्तीचा १५ दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. कुरेशी कुटुंब हे गो तस्करी करणारे कुटुंब असून त्यांची या परिसरात दहशत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचवेळी या घटनेचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला, आरोपीला अटक झाली तरी लगेचच जामीन मिळाला आहे. त्या व्यक्तीने जामीन मिळाल्यानंतर गो तस्करीचा गुन्हा केला आहे. या सर्व प्रकारात पोलिसांकडून दिरंगाई झाली असल्याचा दावा जगताप यांनी केला. तसेच, गो तस्करीचे प्रकार वारंवार करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. गो हत्येच्या संदर्भात वारंवार गुन्हे दाखल होणाऱ्या आरोपींवर यापुढील काळात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याखाली (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पोलीस दलाला देण्यात येतील असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in