महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा सीपी राधाकृष्णन यांनी दिला राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार

सी.पी. राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे गुरूवारी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल...
महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा सीपी राधाकृष्णन यांनी दिला राजीनामा
महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा सीपी राधाकृष्णन यांनी दिला राजीनामा
Published on

सी.पी. राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे गुरूवारी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. राष्ट्रपती भवनाकडून एका पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

१२ सप्टेंबरला घेणार उपराष्ट्रपतीपदाची शपथ

राधाकृष्णन हे ३१ जुलै २०२४ पासून महाराष्ट्राच्या राज्यपालपदी होते. आता १२ सप्टेंबर रोजी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून ते शपथ घेतील. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार म्हणून राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा सरळ लढतीमध्ये पराभव केला. राधाकृष्णन यांना ४५२, तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असलेल्या एकूण ७८१ खासदारांपैकी ७६७ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, त्यापैकी १५ मतपत्रिका अवैध घोषित करण्यात आल्या. यामध्ये बीआरएसचे ४, बिजदचे ७, अकाली दलाचे १ आणि १ अपक्ष खासदार यांनी मतदानात भाग घेतला नव्हता.

कोण आहेत आचार्य देवव्रत? 

आचार्य देवव्रत २०१५ पासून ते २०१९ पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. त्यानंतर जुलै २०१९ मध्ये त्यांच्याकडे गुजरातचे राज्यपालपद देण्यात आले. आता त्यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभारही सोपवण्यात आला आहे. दरम्यान, तुर्तास देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला असला, तरी लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नवीन नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in