

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे रालोआचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील असून ते मुंबईतील मतदार आहेत. महाराष्ट्रातील व्यक्ती उपराष्ट्रपतीपदी विराजमान होणार ही सगळ्यांसाठी अभिमानास्पद बाब आहे. जवळपास सगळेच खासदार त्यांना मतदान करणार असून महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही आवाहन करणार आहे की, त्यांच्या खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान करावे, यासाठी दोघांशी संवाद साधणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जगदीप यांच्या धनखड राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही २१ ऑगस्ट आहे. रविवार १७ ऑगस्ट रोजी भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जेपी नड्डा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. त्यामुळे आता सी. पी. राधाकृष्णन हे रालोआचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. ही निवडणूक लवकरच पार पडणार असून देशाला नवीन उपराष्ट्रपती मिळणार आहे. दरम्यान जगदीप धनखड यांनी अलीकडेच उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नाव रालोआचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर ते सोमवारी दिल्लीला रवाना झाले. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी राजभवन येथे जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.