अटल सेतूच्या पोहच रस्त्यावर पडल्या भेगा; काँग्रेसने सरकारला घेरले; एमएमआरडीएने दिले स्पष्टीकरण

यंदाच्या जानेवारीत खुल्या झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात अटल सेतूच्या पोहच मार्गावर भेगा पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
अटल सेतूच्या पोहच रस्त्यावर पडल्या भेगा; काँग्रेसने सरकारला घेरले; एमएमआरडीएने दिले स्पष्टीकरण
Published on

मुंबई : यंदाच्या जानेवारीत खुल्या झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात अटल सेतूच्या पोहच मार्गावर भेगा पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीने ‘अटल सेतू’चे श्रेय घेतल्याने काँग्रेसने या प्रकरणावरून सरकारला घेरले आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची ‘स्यू-मोटो’ दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा भारतातील सर्वात लांब असलेल्या सागरी सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच महिन्यांपूर्वी करण्यात आले. अटल सेतू उभारण्याचे श्रेय महायुती सरकारने निवडणुकीत घेतले. मात्र या सेतूवर भेगा पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रकरणात काँग्रेसने उडी घेत सरकारला लक्ष्य केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अटल सेतूला भेट दिली. तेथे भेगा पडल्याची बाब अतिशय चिंताजनक असून यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप केला. तसेच उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेऊन चौकशी करावी, अशी आमची मागणी असल्याचे ट्विट पटोले यांनी केले आहे.

अटल सेतूच्या मुख्य भागावर तडे नाहीत, एमएमआरडीएचे स्पष्टीकरण

अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर तडे गेले नसून विविध माध्यमांतून त्याबाबत अफवा पसरविण्यात येत आहेत. अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर किरकोळ भेगा आढळल्या आहेत. हा पोहोच मार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नाहीत. त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण एमएमआरडीएने दिले आहे.

२४ तासांत हे काम पूर्ण केले जाणार

प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने २० जून रोजी केलेल्या तपासणीत उलवेकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक ५ अस्फाल्टवर तीन ठिकाणी भेगा निदर्शनास आल्या आहेत. त्या त्वरित दुरुस्त करण्यासारख्या असून अटल सेतू प्रकल्पाच्या पॅकेज ४ चा कंत्राटदार, मेसर्स स्ट्रॅबॅग या कंपनीने या भागातील दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. यामुळे सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता २४ तासांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in