अरबी समुद्रात अनुकुल स्थिती निर्माण ; मान्सून येत्या ७२ तासांत पुन्हा सक्रीय

मान्सून पुणे, दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रही व्यापण्याची शक्यता आहे
अरबी समुद्रात अनुकुल स्थिती निर्माण ;  मान्सून येत्या ७२ तासांत पुन्हा सक्रीय

बिपरजॉयमुळे खोळंबलेला मान्सून येत्या ७२ तासांत पुन्हा सक्रीय होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून मान्सूनचे वारे पुढे सरकण्यासाठी अनुकुल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण, पुणे, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मान्सूनच्या सरी कोसळतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

यंदा देशावर एल निनोच्या प्रभावामुळे आधीच दुष्काळाचे ढग दिसत आहेत. त्यातच मान्सूनची सुरुवातीची वाटचाल बिपरजॉय चक्रीवादळाने रोखून धरली. बिपरजॉय वादळ राजस्थानात मंदावले आहे. बिपरजॉयमुळे महाराष्ट्रात मान्सूनने आपली वाट थांबवली होती. ११ जून रोजी मान्सून कोकणात दाखल झाला, यानंतर १५ जूनपर्यंत तो राज्यभर हजेरी लावेल, असा अंदाज होता. पण, चक्रीवादळामुळे मान्सून कोकणातून पुढे सरकलाच नाही. आता मात्र, राज्यभरातील बळीराजासाठी हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

त्यामुळे लवकरच मुंबईत मान्सूनचे आगमन होणार आहे. येत्या ७२ तासांमध्ये मान्सून मुंबईत दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात मान्सून सक्रीय होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे रत्नागिरीमध्ये मान्सूनचा थांबलेला प्रवास आता पुढे सरकून पुढील तीन दिवसांत मुंबईत हजेरी लावणार आहे. तसेच मान्सून पुणे, दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रही व्यापण्याची शक्यता आहे. २३ जूनपासून मान्सून अधिक सक्रिय होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in