
पुणे : सुमारे १५० घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत आरोपीला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. यावेळी त्याच्याकडून ३७ तोळे वजनाचे २२ लाख २० हजारांचे दागिने जप्त करण्यात आले अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे यांनी दिली आहे.
संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हडपसर, बिबवेवाडी, सासवड, खेड, अलंकार, लोणीकंद, कोथरूड, दत्तवाडी, पंढरपूर, वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याच्यावर यापूर्वी १५० घरफोडीचे गुन्हे दाखल असून, तो मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा साथीदारांच्या मदतीने वेगवेगळ्या भागात घरफोडीचे गुन्हे करत होता. परंतु त्याने त्याची गुन्ह्याची पद्धत बदलून मध्यरात्री गुन्हे करण्याचे सोडून तो दिवसा घरफोड्या करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
संगतसिंग कल्याणी याने कोंढवा परिसराततील कुबेरा पार्क येथे भर दिवसा घरफोडी केली होती. त्याची ओळख पटू नये म्हणून तो तोंडाला रुमाल बांधून डोक्यावर टोपी घालून गुन्हा करत होता असे सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसून आले. आरोपी हा संबधित गुन्हा करताना ,कोणत्या मार्गाने आला तसेच गुन्हा केल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला या अनुषंगाने पोलिस अंमलदार सुहास मोरे राहुल थोरात, जयदेव भोसले, राहुल राजगे, सीसीटीव्ही पाहून शोध घेत होते. त्यांनी सुमारे 200 सीसीटीव्हींची पाहणी करून आरोपीचा माग काढला. तो थेऊर येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार कल्याणी याला त्याच्या राहत्या घरी पकडण्यासाठी पोलिस पथक गेले होते.