जरांगेंविरोधात फौजदारी याचिका: मुंबईत येण्यापासून रोखा; उद्या होणार सुनावणी

मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळण्यासाठी साखळी उपोषण करण्यावर मनोज जरांगे-पाटील ठाम आहेत.
जरांगेंविरोधात फौजदारी याचिका: मुंबईत येण्यापासून रोखा; उद्या होणार सुनावणी

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर धरणे आंदोलन तसेच उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या विरोधात पंढरपुरात तरुणाने आत्महत्या केल्याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करा, तसेच त्यांना मुंबई येण्यापासून रोखा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली.

अखिल भारतीय माळी समाजाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या दोन स्वतंत्र फौजदारी याचिकांची न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने २४ जानेवारीला सुनावणी निश्‍चित केली.

मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळण्यासाठी साखळी उपोषण करण्यावर मनोज जरांगे-पाटील ठाम आहेत. त्यांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पंढरपूर येथे एक माळी समाजाच्या विकलांग तरुणाने आत्महत्या केली. सुरुवातीला ही आत्महत्या मराठा आंदोलनाला समर्थन म्हणून भासविली गेली. मात्र त्यानंतर तो तरुण माळी समाजाचा असल्याचे उघड झाले. ही आत्महत्या नाही तर मराठा समाजाच्या आंदोलकांनी केलेली हत्या आहे, असा दावा याचिकेत करताना या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याचे आदेश द्या तसेच आंदोलनकर्ते प्रमुख मनोज जरांगे-पाटील यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी याचिकेत केली आहे.

तसेच जरांगे-पाटील हे मुंबईत आंदोलन आणि उपोषण करण्यावर ठाम आहेत. या आंदोलनाला राज्यातून सुमारे दोन कोटी मराठा समाज दाखल होण्याची वल्गना केली जात आहे. त्याचा ताण मुंबईवर पडून सर्व यंत्रणा कोलमडतील, अशी भीती याचिकेत व्यक्त करताना जरांगे-पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in