पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी! कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत फुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी! कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
Published on

पंढरपूर : वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत फुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व सायली पुलकुंडवर तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते मंगळवारी पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रीतम यावलकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवर व मानाचे वारकरी यांचा सत्कार करण्यात आला.

मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

कार्तिक यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. सदरची फुलांची सजावट विठ्ठल भक्त राम जांभुळकर पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे. सजावट सेवेसाठी ३० प्रकारच्या विविधरंगी सुगंधी देशी विदेशी फुलांसह करण्यात आली आहे. यासाठी पांढरी शेवंती, भगवा झेंडू, पिवळा झेंडू, अष्टर, अशोकाची पाने, निशिगंधा, गुलाब, लिलीयम, परपल ऑर्कीड व्हाईट ऑर्कीड, आँथोरियम, कार्नेशन, ब्लू डेजी, पिंक डेजी, तगर, चापा, कागडा, कमिनी, शेवंती, ऑर्कीड, गुलटॅाप, गुलछडी, ब्लु टॅटस, व्हाईट टॅटस, जिप्सो, तुळशी, विड्याची पाने, कामीनी, कमळ ग्लॅडीओ इत्यादी प्रकारची फुले व पाने वापरून संत नामदेव पायरीसह महाद्वार, विठ्ठल सभामंडप, सोळखांबी, चौखांबी, रुक्मिणी सभामंडप, परिवार देवता व व्हिआयपी गेटसह सेल्फी पॅाईंट साकारण्यात आले आहेत.

५ लाख भाविक

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरीत पाच लाख भाविक दाखल झाले आहेत. पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेकरिता एसटी, रेल्वे, खासगी वाहने तसेच दिंड्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. दशमीदिवशी चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्तिमार्ग, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in