
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर शनिवारी झालेल्या भीषण अपघातात दोघे भाविक ठार, तर १३ जण जखमी झाले. यातील तीन महिलांची प्रकृती गंभीर असून इतर भाविक किरकोळ जखमी आहेत.
सिंडखेडराजा तालुक्यातील माळ सावरगाव नजीकच्या मुंबई कॉरिडोरवर शनिवारी सकाळी आसेगाव देवी येथून यवतमाळ जिल्ह्यातील काही भाविक शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना, त्यांच्या क्रूझर कारचा मागच्या बाजूचा टायर फुटला. क्रूझर कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. त्याचवेळी भरवेगात मागून येणाऱ्या क्रेटा कारने क्रूझरला जोरदार धडक दिली. या धडकेत विद्याबाई साबळे (५५), तसेच मोतीराम बोरकर (६०) यांचा जागीच मृत्यू झाला.
भावना रमेश राऊत (३०), प्रतिभा अरुण वाघोडे (४५), मीरा गोटफोडे (६५) या महिला जखमी झाल्या असून त्यांना तत्काळ जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. क्रूझरचालक संतोष साखरकर (२८), कमला जाधव (५५), सुशीला जाणार (५२), मीरा राऊत (६०), छायाबाई चव्हाण (६५), प्रमिला घाटोळ (६०), भक्ती राऊत (५ वर्षे, रमेश राऊत (४०), बेबी येलोत (६०) हे किरकोळ जखमी झाले. सुदैवाने क्रेटा कारमधील कुणालाही दुखापत झाली नाही.