छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे रेल्वे धोरणाबाहेर; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचे उत्तर; शिवसेना ठाकरे गट आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे महाराजांचा पुतळा उभारणे रेल्वे धोरणाबाहेर असल्याचे उत्तर रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी खासदार अरविंद सावंत यांना दिले आहे. यामुळे शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत आक्रमक झाले असून केंद्र सरकारने छत्रपती शिवरायांसोबत देशवासियांचा अवमान केला असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे महाराजांचा पुतळा उभारणे रेल्वे धोरणाबाहेर असल्याचे उत्तर रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी खासदार अरविंद सावंत यांना दिले आहे. यामुळे शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत आक्रमक झाले असून केंद्र सरकारने छत्रपती शिवरायांसोबत देशवासियांचा अवमान केला असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

जागतिक वारसा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची मागणी खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अधिवेशनात फेब्रुवारी महिन्यात केली होती. या मागणीनुसार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी सावंत यांना पत्र दिले आहे. या पत्रामध्ये महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दर्शनी भागात उभारणे रेल्वे धोरणाबाहेर असल्याचे उत्तर दिले आहे.

यामुळे सावंत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यमंत्र्यांचे उत्तर चीड आणणारे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मागे कुठेतरी नको आहे. रेल्वेने त्यांचा पुतळा दर्शनी भागात बांधला पाहिजे अशी मागणी सावंत यांनी केली. गुजरातमधील रेल्वे स्थानकात महापुरुषांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच धर्तीवर सीएसएमटी स्थानकात दर्शनी भागात पुतळा उभारावा अशी मागणी सावंत यांनी केली. राज्याच्या अधिवेशनातही शिवसेना उबाठा पक्षाने सीएसएमटी स्थानकाच्या दर्शनी ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याबाबत मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले की नाही, हे स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in