CTET परीक्षेदरम्यान महिलांना मंगळसूत्र उतरवायला लावल्याने वाद; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर चौकशीचे आदेश

राज्यभरात रविवारी झालेल्या सीटीईटी परीक्षेदरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये गोंधळ उडाला. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना महिला परीक्षार्थींना धातूच्या वस्तू काढण्यास सांगण्यात आले, त्यात मंगळसूत्र काढण्याच्या सूचनेमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

CTET परीक्षेदरम्यान महिलांना मंगळसूत्र उतरवायला लावल्याने वाद; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर चौकशीचे आदेश
CTET परीक्षेदरम्यान महिलांना मंगळसूत्र उतरवायला लावल्याने वाद; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर चौकशीचे आदेश
Published on

संभाजीनगर : राज्यभरात रविवारी घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेदरम्यान (सीटीईटी) छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्रात प्रवेश करताना महिला परीक्षार्थींना धातूच्या वस्तू काढण्यास सांगण्यात आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सौभाग्याचे लक्षण असलेले मंगळसूत्र काढण्यास सांगण्यात आल्याने महिलांची प्रचंड तारांबळ उडाली. या घडनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळी ९.३० ते १२ या वेळेत होणाऱ्या या परीक्षेसाठी परीक्षार्थींना सकाळीच सात वाजताच परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रवेशद्वारावरच कडक सुरक्षा तपासणी करण्यात आली. परीक्षा केंद्रावर कुठलेही धातूचे साहित्य सोबत नेण्यास मनाई असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी महिलांना आपल्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील आणि नाकातील दागिने काढूनच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. पुरुष परीक्षार्थींनाही गळ्यातील चैन, हातातील कडे आणि बोटातील अंगठ्या काढल्यानंतरच प्रवेश देण्यात आला. विशेष म्हणजे, मंगळसूत्रासह कोणतेही दागिने परिधान केलेल्यांना परीक्षा देता येणार नाही, अशी सूचना काही केंद्रांवर देण्यात आली. त्यामुळे अनेक महिला परीक्षार्थी गोंधळून गेल्या. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला.

सुरक्षेच्या नावाखाली महिलांना गळ्यातील मंगळसूत्र म्हणजेच सौभाग्याचे लेणे उतरवावे लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे महिलांना मंगळसूत्र काढायला लावण्याच्या प्रकारावर राज्यात संतापाची लाट पसरली आहे.

परीक्षा पर्यवेक्षकांच्या कार्यपद्धतीवर संताप

परीक्षा पर्यवेक्षकांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘अ‍ॅक्शन मोड’वर आले असून या प्रकाराची चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अहिल्यानगर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “अशाप्रकारच्या तक्रारी मागेही माझ्याकडे आल्या होत्या. त्यामुळे नेमके काय घडले, याची माहिती घेतली जाईल. परीक्षेत कॉपीसारखे गैरप्रकार होत असल्याने तसे करणे योग्य नाही. मात्र, या प्रकाराविषयी योग्य सूचना देण्यात आल्या असून चौकशी करण्यात येणार आहे.”

परीक्षा भारतात आहे की, पाकिस्तानात? - दानवे

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला. “मंगळसूत्र हा दिखाव्याचा दागिना नाही तर तो सौभाग्याचा दागिना आहे. परीक्षा केंद्रावर अशी सक्ती केली जात असेल, तर खूप गंभीर बाब आहे. ‘हिंदुत्व’ आणि ‘संस्कृती’च्या गप्पा मारणाऱ्यांच्या राज्यात महिलांना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावे लागतेय. ११ वर्षांच्या सत्तेनंतरही प्रशासनाला ‘मंगळसूत्र’ आणि ‘कॉपी’मधला फरक कळत नाही बहुधा. ही आपली संस्कृती की सरकारी दडपशाही? परीक्षा भारतात सुरू आहे, पाकिस्तानात नाही,” असे सांगत दानवे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.

logo
marathi.freepressjournal.in