
मुंबई : सध्या लोक नेत्यांच्याच पाया पडताना जास्त लोक दिसतात. मात्र अलिकडचे नेते पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत, असे स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
काँग्रेस सेवादलाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी अजित पवारांनी हे विधान केले.
पवार म्हणाले की, पक्षात येणाऱ्यांची प्रतिमा जनमानसात चांगली असली पाहिजे. चुकीचे काम करणाऱ्यांना पांघरूण घालण्यासाठी कोण येत असल्यास त्यांनी ते पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकावे. मला कायदा श्रेष्ठ वाटतो आणि मी कायद्याचा आदर करतो. चुकीचे समर्थन करणार नाही. दिशाभूल करुन काम फारकाळ टिकत नाही. होणार नसेल तर काम होणार नाही हे मी स्पष्ट करतो, असे ते म्हणाले.
आजची पिढी सेवादलाकडे जात नाही. पण चंद्रकांत दायमा यांनी सेवादल हा आपला परिवार समजून काम केले आहे. दायमा यांचे काम एकत्रित काँग्रेस असताना एकदम जवळून पाहिले आहे. सेवादलाची शिस्त कशी पुढे नेता येईल यासाठी ते काम करत आले आहेत. महिलांचा, वडिलधारी लोकांचा मानसन्मान ठेवला गेला पाहिजे. या कृतीने काम करा, असे त्यांनी सांगितले.
चुकीची वक्तव्य नकोत
महायुतीत अंतर पडेल असे काम कुणाकडून होता कामा नये किंवा चुकीचे वक्तव्य कुणाकडून येता कामा नये. पक्षाला अडचण निर्माण होईल आणि राज्यातील लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल असे वक्तव्य करु नये, भान ठेवून वक्तव्य करा. आता जनतेच्या अपेक्षा मोठ्या आहेत. प्रचंड बहुमताने राज्यात सत्ता आली आहे, असे पवार यांनी सांगितले.