

नाशिक : अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. पीडित महिलांची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, पीडित महिलांसोबत इतर संबंधित महिलांचेही फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निरपराध महिलांचीही बदनामी होत असल्याने पोलिसांनी अशा प्रकारांना गांभीर्याने घेतले आहे.
कोणत्याही प्रकारे बदनामीकारक मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर थेट गुन्हा नोंदवला जाणार आहे. दरम्यान, पीडित आणि तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
खरातची तिसऱ्या दिवशीही चौकशी
दरम्यान, अशोक खरातची सोमवारी (दि. 23) पुन्हा एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. गेल्या दोन तासापासून अशोक खरातची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष तपास पथकाच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते या स्वतः खरातची चौकशी करत असल्याची माहिती आहे. नाशिक क्राईम ब्रँचकडून खरातची काल रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली होती. यानंतर त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आता पर्यंत अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. अशोक खरातचे काळे कारनामे उघडकीस आणण्यासाठी विशेष तपास पथक आणि नाशिक क्राईम ब्रँचकडून सखोल तपास केला जात आहे.
अधिकारी, मंत्र्यांना करा सहआरोपी : वडेट्टीवार
भोंदूबाबा खरात प्रकरणी विरोधकांनी आज विधिमंडळात राज्य सरकारवर अपेक्षेनुसार टीकेचा भडिमार केला. ज्या मंत्र्यांनी आणि संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी खरातसारख्या भोंदूबाबाला प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांनाही सहआरोपी करावे अशी मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली. स्वतःला देवाचा अवतार सांगून आणि ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणाऱ्या अशोक खरातचे १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत असा दावा करून ते म्हणाले की, खरातवर कारवाई होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये तीन उच्चपदस्थ अधिकारी बैठक घेत होते. ही माहिती अत्यंत धक्कादायक असून महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांचा यात समावेश होता.
हे अधिकारी आणि मंत्री संविधानाची शपथ घेतात, मात्र प्रत्यक्षात भोंदूबाबांच्या पाया पडताना दिसतात, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे असेही वडेट्टीवार म्हणाले. या प्रकरणी वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनीही सरकारवर जोरदार हल्ला केला.