हवामान खात्याकडून मुंबईसह कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनच्या अगोदर मुंबईसह कोकणाला 'बिपरजॉय' चक्रीवादळ धडकणार आहे. अरबी समुद्राच्या अग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने 'बिपरजॉय' नावाचे चक्रिवादळ तयार झाले आहे. पुढील 24 ते 48 तासांत हे चक्रीवादळ मुंबई आणि कोकणच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात या वादळाची स्थिती आणि दिशा स्पष्ट होणार असल्याचं हवामान खात्याच्या तज्ञांनी ट्विट करत सांगितलं आहे.
हे चक्रीवादळ समुद्राच्या पृष्ठभागापासून 5.8 किमीपर्यंत पसरले आहे. अरबी समुद्राच्या अग्नेयला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या 24 तासांत हे वादळ 8,9,10 जून पर्यंत कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा वेग 40-50 ते 60 किमी प्रति तास असा असणार असा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमिवर मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या चक्रीवादळाचं केंद्र समुद्राच्या खोल असल्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर जास्त पाऊस पडण्याची शक्यता नाही. मात्र, समुद्रात उंच लाटा उसळण्याची असल्याने मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासात हे वादळ उत्तरेकडे सरकणार आहे. मागच्या तीन तासात या वादळाने 11 किमी प्रति तास वेगाने प्रवास केला आहे. पुढील 12 तासांत हे वादळ आपला वेग वाढवणार असून ताशी 40-50 ते 60 किमी वेगापर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.