
पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळामुळे पश्चिम किनारपट्टीवर हवामानात बदल होत असतानाच तिकडे बंगालच्या उपसागरातही हमून नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे देशाच्या पूर्वोत्तर पाच राज्यांना हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे.
सध्या हे वादळ बांगलादेशच्या किनारी भागांत असून येत्या काही तासांत ते पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या वादळाचा परिणाम त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि मिझोराम या पाच राज्यांना बसण्याची शक्यता असून या राज्यांना अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये पुढील एक ते दोन दिवसांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असून समुद्रकिनाऱ्यावर मोठमोठ्या लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं किनारी भागांतील नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आंध्र प्रदेश, ओदिशा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागातील नागरिकांनाही दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.