मुंबई : ऑक्टोबर महिना उजाडला तरी पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. एकीकडे राज्यावर ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले असतानाच, आता पुन्हा एकदा राज्याला धडकी बसणार आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे पालघरसह मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ७ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टी भागात ५० ते ६० किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत 'शक्ती' चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. 'शक्ती' हे २०२५ मधील पहिलेच चक्रीवादळ असून शुक्रवार दुपारनंतर या वादळाची निर्मिती झाली. किनाऱ्यापासून पश्चिमेकडे सरकत असलेले हे चक्रीवादळ शनिवार, ४ ऑक्टोबरनंतर आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र मध्य भारताकडून प्रवास करीत अरबी समुद्राकडे आल्यानंतर ईशान्य अरबी समुद्रात त्याची तीव्रता वाढू लागली आहे. गुजरातमधील द्वारकेपासून २५० किलोमीटर, तर नालियापासून २८० किलोमीटर नैऋत्येकडे, पोरबंदरपासून २८० किलोमीटर पश्चिमेकडे आणि पाकिस्तानच्या कराचीपासून ३८० किलोमीटर दक्षिणेकडे या चक्रीवादळाची तीव्रता होती. शक्ती सुरुवातीला पश्चिमेकडे आणि नंतर पश्चिम-नैऋत्येकडे सरकण्याची अपेक्षा आहे, शनिवारी तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल. चक्रीवादळामुळे, रविवारपर्यंत गुजरात-उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी आणि पाकिस्तान किनारपट्टीवर समुद्राची परिस्थिती खवळलेली ते खूप खवळलेली राहण्याची शक्यता आहे. ६ ऑक्टोबरच्या सकाळपासून चक्रीवादळ कमकुवत होण्याची शक्यता आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील अरबी समुद्रात जाऊ नये असा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे. शक्ती चक्रीवादळामुळे पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा वाहू शकतो. त्याशिवाय चक्रीवादळाचा वेग, उंच लाटा यामुळे समुद्रातील परिस्थिती खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली असून स्थलांतराच्या उपाययोजनांचीही तयारी केली आहे.
पालघर जिल्ह्यात ४ ते ७ ऑक्टोबरदरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात एक ते दोन ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण किनाऱ्यावर वादळ, वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शक्ती चक्रीवादळाचा फटका किनारपट्टीच नव्हे तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांनाही बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूरसह अनके जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.