नागपुरात फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून यात चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय तर दोन महिला जखमी झाल्या आहेत. नागपुरातील जुन्या व्हीसीएग्राऊंड परिसरात ही घटना घडली आहे. जखमी महिलांवर शहरातील मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सिझान आसिफ शेख असे या स्फोटात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून फारिया हबीब शेख(28) आणि अनमता हबीब शेख(24) असे जखमी महिलांची नावे आहेत. या घटनेनंतर फुगेवाला फरार झाला आहे. सिलेंडरचा स्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समोर येऊ शकले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठ वाजेदरम्यान व्हीसीए मैदानावर रात्री ८.३० वाजता एक फुगेवाला गॅसने भरलेले फुगे विकत होता. क्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने सिझान मावशी फारिया व अनमता यांच्यासोबत फिरायला गेला होता. फुगेवाल्याला पाहून सिझानने फुगे घेण्याचा हट्ट केला. त्यानंतर ते तिघे फुगेवाल्याकडे गेले. यावेळी फुग्यात गॅस भरत असताना सिलेंडरचा अचानाक स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता की सिलेंडर हवेत उडाला. स्फोटचा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत चिमुकल्या सिझानचा मृत्यू झाला होता. यानंतर उपस्थितांनी जखमी फारिया शेख आणि अनमता शेख यांना मेयो रुग्णालयात दाखल केले.
या घटनेतील फुगेवाल्याचे नाव मात्र समजू शकले नाही. तो रविवारी जुन्या व्हीसीएग्राऊंड परिसरात फुगे विकण्यासाठी येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत फुगेवाला जखमी झाला नसल्याचे देखील सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.