कोरेगावमध्ये गॅसगळतीमुळे सिलिंडरचा स्फोट सुदैवाने जीवितहानी नाही; मात्र पवार कुटुंबीयांचा संपूर्ण संसार जळून खाक

रहिमतपूर नगरपालिकेच्या अग्निशामक बंबासह कोरेगाव नगरपंचायतीच्या पाण्याच्या टँकरने आग आटोक्यात आणण्यात आली.
कोरेगावमध्ये गॅसगळतीमुळे सिलिंडरचा स्फोट 
सुदैवाने जीवितहानी नाही; मात्र पवार कुटुंबीयांचा संपूर्ण संसार जळून खाक
Published on

कराड : शहरातील मुजावर कॉलनीमध्ये स्फोट होऊन त्यामध्ये ९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच कोरेगाव शहरातील गणेशनगर येथे पवार कुटुंबीयांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा गळती होऊन त्यानंतर पसरलेल्या गॅसने पेट घेत लागलेल्या आगीने क्षणातच रौद्ररुप धारण केले. या आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण संसारच जळून खाक झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, अथवा एकही जखमी झाले नाही.

रहिमतपूर नगरपालिकेच्या अग्निशामक बंबासह कोरेगाव नगरपंचायतीच्या पाण्याच्या टँकरने आग आटोक्यात आणण्यात आली. कोरेगाव शहरातील गणेशनगर येथे दिलीप पवार, सुभाष पवार, प्रमोद पवार, सोमनाथ सुभाष पवार, प्रमोद बाळासाहेब पवार आणि योगेश दिलीप पवार हे वास्तव्यास आहेत. त्यांचे घर पत्र्याच्या शेडमध्ये असून, त्यातच ते राहतात. सोमवारी रात्री स्वयंपाक सुरू असताना गॅस सिलिंडरच्या रबरी पाईपमधून गॅस गळती सुरू झाली होती; मात्र ही बाब कुटुंबातील कोणाच्याच लक्षात आली नाही. त्यामुळे गळती झालेल्या गॅसने अचानक पेट घेत आग लागली. कुटुंबातील महिलांनी प्रसंगावधान राखत गॅसची शेगडी बंद केली; मात्र पाईपमध्ये असलेल्या गॅसने पेट घेतल्याने पाईपने उलटा पेट घेतला आणि क्षणातच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण शहर हादरले.

logo
marathi.freepressjournal.in