सत्ताधारी आमदार व मंत्र्यांमध्येच जुंपली; मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये धक्काबुक्कीचा प्रकार

विकासकामे आणि निधीवाटपावरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्येच धुसफूस असल्याचे शुक्रवारी उघड झाले.
सत्ताधारी आमदार व मंत्र्यांमध्येच जुंपली; मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये धक्काबुक्कीचा प्रकार
Published on

मुंबई : विकासकामे आणि निधीवाटपावरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्येच धुसफूस असल्याचे शुक्रवारी उघड झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चक्क सत्ताधारी पक्षातीलच मंत्री आणि आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात पहिली शाब्दिक चकमक झडली आणि नंतर धक्काबुकी झाल्याचे विरोधकांनी सांगितले. मात्र, अशी कोणतीही धक्काबुक्की झाली नसल्याचा दावा करीत मंत्री दादा भुसे यांनी याबाबत विरोधकांच्या आरोपांचे सभागृहात खंडन केले. दोन्ही सभागृहांत या कथित घटनेचे पडसाद उमटले.

विधीमंडळाच्या लॉबीमधून मंत्री दादा भुसे जात असताना आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्याशी विकासकामावरून चर्चा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढून धक्काबुक्की झाली. त्यावेळी लॉबीमध्ये एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याचवेळी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने धाव घेत दोघांमध्ये मध्यस्थी केली व वाद शमविल्याचे समजते. मात्र, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा शंभूराज देसाई यांनीही केला आहे. दादा भुसे व थोरवे यांच्यात चर्चा सुरू होती. चर्चा सुरू असताना त्यांचा आवाज थोडा वाढला, त्यापलीकडे काहीही झालेले नाही. आमदार त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांची विकासकामांवरूनच चर्चा सुरू होती. थोरवे यांच्या मतदारसंघातील विकासकामासंदर्भात बैठक घेऊन मार्ग काढण्याचे ठरले आहे, असे देसाई यांनी विधीमंडळाच्या दोन्हीही सभागृहात स्पष्ट केले.

असा कोणताही प्रकार घडला नाही -भुसे

सभागृहाचे कामकाज थोड्या वेळासाठी बंद करून सभागृहाला माहिती द्या, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तालिका अध्यक्षांकडे केली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे काहीही घडलेले नाही. आपण भुसे व थोरवे या दोघांशीही बोललो असल्याचे सांगितले. दरम्यान, याचवेळी मंत्री दादा भुसे सभागृहात आले आणि त्यांनी आमच्या दोघांमध्ये असे काहीच घडलेले नसल्याचे सांगत विरोधकांच्या आरोपाचे खंडन केले. तसेच सीसीटीव्हीचे फुटेजही पाहायला काहीच हरकत नाही. अध्यक्ष ते फुटेज दाखवू शकतात, असे भुसे म्हणाले.

मतदारसंघातील रस्त्याचे काम मंत्र्यांकडे दिले होते. ‘एमएसआरडीसी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांनी जाणीवपूर्वक मी दिलेले काम येऊ दिले नाही. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी सांगूनही दादा भुसे काम करत नाहीत. कोणत्याही आमदारासोबतचे त्यांचे वर्तन चांगले नसते. अत्यंत नकारात्मक वृत्तीचे मंत्री म्हणजे दादा भुसे. माझा आवाज वाढला, वाद झाला, कारण आम्ही लोकांची कामे घेऊन जातो. त्यांच्या घरचे जेवायला जात नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे संस्कार आहेत, असे महेंद्र थोरवे यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in