उद्यापासून दादर ते पंढरपूर-मिरज-सातारा विशेष रेल्वे; त्रिसाप्ताहिक गाडीचे वेळापत्रकही जारी, प्रवाशांना-भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन

विस्तार होणार होणार म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या दादर ते पंढरपूर व पंढरपूर-सातारा ही विशेष रेल्वे सेवा आता रुळावर येत असून येत्या दि. १६ रोजीपासून ही त्रिसाप्ताहिक रेल्वे सुरू होत आहे.
उद्यापासून दादर ते पंढरपूर-मिरज-सातारा विशेष रेल्वे; त्रिसाप्ताहिक गाडीचे वेळापत्रकही जारी, प्रवाशांना-भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन
Published on

कराड : विस्तार होणार होणार म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या दादर ते पंढरपूर व पंढरपूर-सातारा ही विशेष रेल्वे सेवा आता रुळावर येत असून येत्या दि. १६ रोजीपासून ही त्रिसाप्ताहिक रेल्वे सुरू होत आहे. शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजता पंढरपूरहुन सुटणारी ही गाडी मिरजमार्गे साताऱ्यात दुपारी सव्वा दोन वाजता पोहचणार आहे तर एक तासाच्या विश्रांतीनंतर त्याचदिवशी दुपारी सव्वा तीन वाजता ही गाडी साताऱ्यातून मार्गस्थ होऊन पंढरपूरला रात्री साडे नऊ वाजता पोहचेल. ही गाडी त्रिसाप्ताहिक असून सोमवार, मंगळवार व शनिवार या दिवशी साताऱ्याहून मिरज-पंढरपूरमार्गे दादरकडे जाईल तर रविवार, सोमवार आणि शुक्रवार दादरहून सुटून पंढरपूर, मिरज,कराड मार्गे साताऱ्याला येईल, अशी माहिती येथील पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी आज ‘नवशक्ति‘शी बोलताना दिली.

गोपाळ तिवारी म्हणाले, सध्या ही रेल्वे गाडी दादरवरून सुटून पंढरपुरपर्यंत सोलापूरमार्गे सुरू आहेच. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचा दक्षिण भाग,सातारा व सांगली जिल्ह्यातील विठ्ठल रुख्मिणीच्या भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी थेट गाडीची सोया नव्हती. त्यासाठी येथील प्रवाशांना मिरजेपर्यंत जाऊन नंतर गाडी बदलून पंढरपूरला जावे लागत असे.त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत होती व पुणे ते पंढरपूर अशी रेल्वे गाडी सोडण्याची मागणी वारंवार होत होती. अखेर या मागणीची रेल्वे प्रशासनाने दाखल घेत सध्याच्या दादर-पंढरपूर एक्सप्रेस रेल्वे गाडीचा साताऱ्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय मागेच घेतला होता. मात्र प्रत्यक्षात ही गाडी सुरू करण्यात आली नव्हती. आता ही विस्तारीत त्रिसाप्ताहिक गाडी शनिवारपासून साताऱ्यापर्यंत धावणार आहे.

याबाबतचे वेळापत्रकही मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.

असे असणार थांबे

सदर विस्तारित गाडीला दादर ते पंढरपूर दरम्यान पूर्वीप्रमाणेच थांबे व वेळा आहेत,मात्र पंढरपूरपासून सातारा दरम्यानच्या मार्गावरसांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर आणि कोरेगाव असे थांबे देण्यात आले आहेत.

गाडीचे वेळापत्रकाचा तपशील खालीलप्रमाणे

येत्या शनिवारपासून गाडी क्रमांक ११०२७ दादर-सातारा एक्स्प्रेस त्रि - साप्ताहिक गाडी दादरहून दर रविवार, सोमवार आणि शुक्रवारी रात्री १२ वा सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वा दोन वाजता सातारा येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ११०२८ सातारा - दादर एक्स्प्रेस सातारा येथून दर सोमवार, मंगळवार आणि शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.३५ वाजता दादरला पोहोचेल.

प्रवाशांनी व भाविकांनी लाभ घ्यावा

पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील भाग,सातारा, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होवुन या प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी सोयीची नसली तरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी थेट गाडी उपलब्ध झाली आहे. ही गाडी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार व शनिवार या दिवशी साताऱ्याहुन पंढरपूर,दादरकडे जाईल तर रविवार सोमवार आणि शुक्रवार दादरहून सुटून पंढरपूर-मिरजमार्गे साताऱ्यापर्यंत येईल. त्याचा प्रवाशांनी व भाविकांनी लाभ घ्यावा, असे, आवाहनही गोपाळ तिवारी यांनी ‘नवशक्ति’शी बोलताना केले.

खा. श्रीनिवास पाटील यांची रेल्वे मंत्र्याकडे मागणी

साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी इंदु दुबे यांच्याकडे ही रेल्वे सेवा साताऱ्यापर्यंत विस्तारीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता ही रेल्वेसेवा साताऱ्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी इंदु दुबे यांच्याकडे ही रेल्वे सेवा साताऱ्यापर्यंत विस्तारीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता ही रेल्वेसेवा साताऱ्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in