डागा दाम्पत्याचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवून त्या ठिकाणी अग्निशमन गाडी आणि रुग्णवाहिका तैनात केली
डागा दाम्पत्याचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

कराड : सातारा शहरातील सदरबाजार येथील लक्ष्मी प्रकाश डागा यांना २ लाख रुपयांची खंडणीची मागणी करणारा व ती नाही दिली तर त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शहरातील गुटखा विक्रेत्यावर साताऱ्याचे पोलीस कारवाई करत नसल्याच्या व याबाबत पालकमंत्र्यांकडे दाद मागूनही काहीच कारवाई केली गेली नसल्याच्या निषेधार्थ डागा दाम्पत्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील निवास्थानासमोर आत्मदहन आंदोलन केले.मात्र सातारा पोलिसांनी वेळीच डागा दाम्पत्यास आत्मदहन करण्यापासून परावृत करत त्यांना रोखण्यात यश आले. डागा दाम्पत्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा शहरातील सदरबाजार येथे राहणारे प्रकाश डागा यांच्या पत्नी लक्ष्मी डागा यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे गेल्या १७ ऑक्टोबर रोजी निवेदन दिले होते.त्यावेळी त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराबाहेर शुक्रवारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार सातारा पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासून आत्मदहनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवून त्या ठिकाणी अग्निशमन गाडी आणि रुग्णवाहिका तैनात केली होती.त्याच दरम्यान, त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार डागा दाम्पत्य आले व त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, दोघावर सातारा शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in