
पुणे : सनई व मंगलाष्टकांचे मंगल स्वर... लग्न सोहळ्यासाठी सजलेला मंडप आणि मंगलमूर्तीच्या भोवती केलेली आंब्यांची आरास... अशा वातावरणात अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यासोबतच श्री गणेश आणि देवी शारदा यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई यांच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. गाणपत्य सांप्रदायातील परंपरेनुसार विवाह सोहळ्याचे आयोजन देखील केले जाते.
सकाळी ११ वाजून ०९ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम् सोहळा थाटात पार पडला. सभामंडपात लग्न सोहळ्यातील सर्व धार्मिक विधींसह मंगलाष्टके देखील झाली. मंदिरात बुधवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायिका वेदश्री खाडिलकर - ओक यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी ८ वाजता गणेशयाग झाला. रात्री अखिल भारतीय महिला वारकरी मंडळाच्यावतीने उटीचे भजन देखील आयोजित करण्यात आले होते.