राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्णाण झाली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी केला आहे. तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे समुद्राला उधाण आलं आहे. यामुळे समुद्र किनारी तसच समुद्राच्या आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परिस्थिती लक्षात घेता येत्या ३१ जुलैपर्यंत सुमद्रातील मासेमारी देखील बंद करण्यात आली आहे. मच्छीमारांना देखील समुद्राच्या आत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. असं असताना देखील डहाणू येथील दोन तरुणांनी बोटीने समुद्रात जायचं धाडस करायचं ठरवल्याने हे धाडसं त्यांच्या जीवावर बेतलं आहे. या दोन तरुणांपैकी एक तरुण बेपत्ता झाला असून एक तरुण पोहत समुद्रकिनारी पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे.
डहाणूतील हे तरुण बोटीने समुद्रात जात असताना काही अंतर आत गेल्यावर त्यांची बोट दुर्घटनाग्रस्त झाली आहे. बोटला दुर्घटना झाल्यानंतर एक तरुण बेपत्ता झाला आहे. तर दुसरा पोहत समुद्र किनाऱ्यावर पोहचला आहे. बेपत्ता मुलचा कोस्ट गार्ड कडून शोध घेतला जात आहे. कोस्ट गार्ड हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बेपत्ता मुलाचा शोध घेत आहे. मात्र, अद्यापही त्याचा शोध लागला नसल्याची माहिती कोस्ट गार्डकडून देण्यात आली आहे. भूपेंद्र अंभिरे असं या बेपत्ता मुलाचं नाव असून त्याच्या सोबतचा संजय पाटील याने पोहत समुद्रकिनारा गाठला आहे. कोस्ट गार्डकडून अद्यापही शोधमोहीम सुरु आहे.