काँग्रेसचा डॅमेज कंट्रोल सुरू, काँग्रेससोबत महाविकास आघाडीलाही फटका

अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.
काँग्रेसचा डॅमेज कंट्रोल सुरू, काँग्रेससोबत महाविकास आघाडीलाही फटका

प्रतिनिधी/मुंबई

अशोक चव्हाण यांच्या काँग्रेसला दिलेल्या सोडचिठ्ठीचा फटका काँग्रेसला तर बसणार आहेच, पण राज्यातील महाविकास आघाडीला देखील बसणार आहे. अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. नुकतेच काँग्रेस नेते मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. लोकसभा निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांच्या या भूमिकेमुळे केवळ काँग्रेसलाच धक्का बसणार नसून महाविकास आघाडीलाही त्याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी आता डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्ली गाठली असून हायकमांडशी चर्चा केली आहे. येत्या काही दिवसांत महाविकास आघाडीच्या नेत्यांची देखील संयुक्त बैठक होऊ शकते.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार हे निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे इतरही काही आमदार काँग्रेसला सोडणार आहेत. काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी तातडीने दिल्लीत दाखल झाले असून या सर्व प्रकरणांवर त्यांनी हायकमांडशी चर्चा केली आहे. अशोक चव्हाण १४ तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने यासंदर्भात काँग्रेस हायकमांडकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाल्याची माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली आहे.

अशोक चव्हाण यांचा राजीनामा हा काँग्रेसप्रमाणेच महाविकास आघाडीलाही जोरदार धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. मराठवाड्याच्या राजकारणावर त्यांची चांगली पकड आहे. मोदीलाटेतही ते लोकसभेवर निवडून गेले होते. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे काही दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये अशोक चव्हाणांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्याबरोबरच आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेदरम्यानही चव्हाण हजर होते. त्यानंतर त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाविकास आघाडीच्या नेत्यांची देखील संयुक्त बैठक होऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in