मराठवाड्यातील धरणे कोरडीच; जोरदार पावसाची प्रतीक्षा

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असला, तरी मराठवाड्यात तुरळक पाऊस सुरू आहे.
मराठवाड्यातील धरणे कोरडीच; जोरदार पावसाची प्रतीक्षा
प्रातिनिधिक फोटो
Published on

सुजित ताजने / छत्रपती संभाजीनगर

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असला, तरी मराठवाड्यात तुरळक पाऊस सुरू आहे. मोठा पाऊस झाला नसल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढलेला नाही. मध्यम आणि लघु प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नसल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. विभागातील मोठ्या ११ प्रकल्पांत १६.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर ७५ मध्यम प्रकल्पांत १०.३७ टक्के आणि ७४९ लघु प्रकल्पांत ११.७६ टक्के पाणीसाठा आहे. गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात १७.९० आणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यात ४६ टक्के पाणीसाठा आहे. विभागातील एकूण ८७७ प्रकल्पात १५.०२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या २४ तासात मराठवाड्यात ९.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

मराठवाड्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे धरणात पाणीसाठा वाढलेला नाही. जून आणि जुलै महिना संपत आला, तरी अपेक्षित पाऊस झाला नाही. दुसऱ्या आठवड्यापासून जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण, मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी वगळता मोठा पाऊस झाला नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून पावसाचा खंड आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुलनेने चांगला पाऊस झाला आहे. इतर भागात पाऊस नसल्यामुळे पिण्याचे पाणी आणि सिंचनाचे पाणी उपलब्ध नाही.

मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांपैकी तीन धरणांत पाणी नाही. मध्यम, लघु प्रकल्पात पाणी नसल्यामुळे अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. जायकवाडी धरणात जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर काही प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. सद्यस्थितीत धरणात चार टक्के पाणीसाठा आहे. सध्या पाण्याची आवक थांबली आहे. उर्ध्व भागातील धरणे भरली नसल्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा वाढलेला नाही. मांजरा, सिना कोळेगाव आणि माजलगाव ही धरणे कोरडी आहेत.

९८ लघु प्रकल्पांपैकी ७४ प्रकल्प कोरडे

१६ प्रकल्पांत चार टक्के, जालना जिल्ह्यातील सात प्रकल्पांत तीन टक्के, बीडमधील १५ प्रकल्पांत नऊ टक्के, लातूर आठ प्रकल्पांत ११ टक्के, धाराशिवमधील सात प्रकल्पांत एक टक्के, नांदेड जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांत २१ टक्के पाणीसाठा असून, परभणीतील दोन मध्यम प्रकल्पांत ११ टक्के पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुखना, लाहुकी, ढेकू, नारंगी, बोरदहेगाव, वाकोद, गिरजा, अंबाडी, अंजना पळशी आणि पूर्णा नेवपूर मध्यम प्रकल्प कोरडे आहेत. जिल्ह्यातील ९८ लघु प्रकल्पांपैकी ७४ प्रकल्प कोरडे आहेत.

मोठ्या धरणांतील पाणीसाठा

  • जायकवाडी ४

  • येलदरी ३०

  • सिद्धेश्वर २

  • माजलगाव ०

  • माजरा ०

  • उर्ध्व पेनगंगा ३९

  • निम्न तेरणा २३

  • निम्न मनार २७

  • विष्णुपुरी ६३

  • निम्न दुधना ०६

  • सीना कोळेगाव ०

  • (पाणीसाठा टक्केवारीत)

logo
marathi.freepressjournal.in