Kolhapur : दानोळीत २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; व्यावसायिकाचा खून उघड

दानोळी ता. शिरोळ येथील तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा यांच्या अपहरण प्रकरणाने भीषण वळण घेतले आहे. २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्यानंतर त्यांचा खून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Kolhapur : दानोळीत २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; व्यावसायिकाचा खून उघड
Published on

दानोळी : दानोळी ता. शिरोळ येथील तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा यांच्या अपहरण प्रकरणाने भीषण वळण घेतले आहे. २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्यानंतर त्यांचा खून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी भरतेश यांचे अपहरण केले होते. अपहरणानंतर त्यांच्या मोबाईलवरूनच चुलत भावाला फोन करून २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. अपहरणकर्त्यांनी दोन वेळा पैसे आणण्याचे ठिकाण बदलले. भरतेश यांचे दोन मित्र आणि भाऊ महावीर हे सांगितलेल्या ठिकाणी गेले असता पुन्हा फोन आला; मात्र काही वेळात मोबाईल बंद झाला.

दरम्यान, पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी स्वतः शोधमोहीम सुरू केली. शहरीमळा रस्त्यालगत उसाच्या शेतात भरतेश यांची गाडी, चप्पल तसेच दुसऱ्या व्यक्तीचा मफलर आणि नाईट बूट आढळून आले. घटनास्थळी सापडलेल्या या वस्तूंवरून पोलिसांनी संशयाच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले असून भरतेश टोपगोंडा यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयित आरोपीकडून अधिक माहिती घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या घटनेमुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनेस्थळी धाव घेत माहिती घेतली. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.

...तर तो वाचला असता

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने काल रात्री ९ वाजता जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी सुरुवातीला केवळ मिसिंगची नोंद करून ‘उद्या पाहू’ अशी भूमिका घेतली, पोलीसांनी वेळी दखल घेतली असती तर भरतेश वाचला असता असा सुर ग्रामस्थांमधुन होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in