दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याची निविदा मंजूर

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला तालुका हा दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करत आहे.
दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याची निविदा मंजूर

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला तालुका हा दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करत आहे. त्यांच्या प्रयत्नातून देवसाने मांजरपाडा प्रकल्प साकार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगाव पर्यंत पोहोचविण्यासाठी त्याच्या माध्यमातून दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा व पुणेगाव दरसवाडी डावा कालवाचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण करण्यासाठी २५२ कोटी ७४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून निविदा प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असल्याने या कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

येवला तालुका हा सतत दुष्काळाच्या छायेत असलेला तालुका होता. सन २००४ पासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांनी हजारो कोटी रुपयांची विविध विकास कामे करून पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची कामे मार्गी लावली आहे. त्यांच्या माध्यमातून येवल्यासाठी असलेल्या मांजरपाडा या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील दरसवाडी पोहोच कालवा व पुणेगाव डावा कालव्याची वहन क्षमता वाढविण्यासाठी या कालव्याचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण करण्याचे त्यांचे प्रयत्न होते. त्यानुसार या कामासाठी यापूर्वीच निधीला मंजुरी देखील देण्यात आली होती.

या कामास मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून कामास सुरुवात व्हावी यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यांनतर आता दरसवाडी पोहोच कालवा कि.मी.० ते ८८ चे मातीकाम बांधकामे व अस्तरीकरणाचे नुतनीकरण करण्यासाठी १५२ कोटी ९० लक्ष तर पुणेगाव डावा कालवा कि.मी. ० ते ६३ चे मातीकाम बांधकामे व अस्तरीकरणाचे नुतनीकरण करण्यासाठी ९९ लक्ष ८४ रुपयांच्या किमितीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून निविदा प्रस्तावास शासनाने मंजुरी दिल्यामुळे या कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मांजरपाडाचे पाणी डोंगरगाव पर्यंत जाऊन येवला तालुक्यातील सिंचन क्षमतेत अधिक वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in