

नवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी येथील वडिलोपार्जित जमिनीचा अखेर व्यवहार पार पडला आहे. दाऊदशी संबंधित जमीन दोन जणांनी विकत घेतली आहे. या जमिनींचा लिलाव वारंवार पुकारण्यात आला होता. पण या जमिनींची खरेदी करण्यासाठी कुणीही तयार नव्हते. अखेर दाऊदची वडिलोपार्जित जमीन आता विकली गेली आहे. केंद्र सरकारने हा लिलाव आयोजित केला होता.
केंद्र सरकारने ५ मार्च २०२६ ला दाऊदच्या रत्नागिरी तालुक्यातील खेड येथील मुम्बके गावात असलेल्या जमिनीचा लिलाव आयोजित केला होता. चार भूखंडांसाठी हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. हे भूखंड कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाचे आहेत. त्याची आई अमीना बीच्या नावे हे भूखंड होते. या लिलावात मुंबईच्या एका व्यक्तीने चारपैकी एक भूखंड खरेदी केला. तर आणखी एका व्यक्तीने तीन भूखंड सर्वाधिक बोली लावून विकत घेतले. या दोन्ही ग्राहकांची ओळख सरकारतर्फे गोपनीय ठेवण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम हा भारतातील कुख्यात गँगस्टर आहे. तो ९० च्या दशकातच दुबईला पळाला. सध्या तो कराचीमध्ये आहे, अशी माहितीही पुढे आली होती. दरम्यान, त्याच्या मालमत्तांचा लिलाव अखेर केंद्र सरकारने केला.
‘साफेमा’ कायद्यानुसार कारवाई
केंद्र सरकारने ‘स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स फॉरफीचर ऑफ प्रॉपर्टी कायदा’ अर्थात ‘साफेमा’च्या अंतर्गत हे भूखंड जप्त केले होते. ही कारवाई अशा गुन्हेगारांच्या विरोधात होते ज्यांचा संबंध अपराध किंवा तस्करी यांच्याशी जोडलेला असतो. २०१७, २०२०, २०२४ आणि २०२५ अशा वर्षांमध्ये एकूण चारदा या जमिनींचा लिलाव जाहीर करण्यात आला होता. पण कुणीही बोली लावण्यासाठी पुढे आलेले नव्हते. त्यामुळे हे भूखंड विकत कोण घेणार? असा पेच निर्माण झाला होता. आता मात्र हे चारही भूखंड विकण्यात आले आहेत. ‘एनडीटीव्ही’ने हे वृत्त दिले आहे.
दाऊदच्या भूखंडांसाठी किती बोली लागली?
दाऊदच्या भूखंडांसाठी वेगवेगळ्या किंमती ठरवण्यात आल्या होत्या. मुख्य भूखंडाची किंमत ९ लाख ४१ हजार ठरवण्यात आली होती. हा भूखंड १० लाखांहून अधिक किंमतीला विकला गेला. ज्यांनी लिलावात ही बोली लावून जमीन विकत घेतली आहे त्यांना एप्रिल २०२६ पर्यंत संपूर्ण रक्कम जमा करावी लागणार आहे. त्यानंतरच हा व्यवहार कायदेशीर मानला जाईल. दाऊद पळून गेल्यानंतर केंद्र सरकारने हे भूखंड जप्त केले होते.