साईदर्शनाला निघालेल्या चार भाविकांचा मृत्यू

या अपघातात नवीन लग्न झालेले जोडपेदेखील होते. तर अपघाताचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
साईदर्शनाला निघालेल्या चार भाविकांचा मृत्यू
PM

सोलापूर : शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा-नगर मार्गावर पांडे गावाजवळ बुधवारी शिर्डीला जाणाऱ्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून एक आठ महिन्यांची चिमुकलीही जखमी झाली आहे. हे भाविक कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील गुलबर्गा येथील काही भाविक पांडेमार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात होते. बुधवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास करमाळ्यातील पांडे गावाजवळ हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन उलटली. गाडीचा चक्काचूर झाल्याने त्यातील चौघांना प्राण गमवावे लागले. तर सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तत्काळ जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

श्रीशैल चंदेशा कुंभार (५६, गुलबर्गा), शशिकला श्रीशैल कुंभार (५०, गुलबर्गा) आणि ज्योती दीपक हिरेमठ (३८, बागलकोट) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, शारदा दीपक हिरेमठ (७०, हुबळी) यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. सौम्या श्रीधर कुंभार (२६), कावेरी विश्वनाथ कुंभार (२४), शशिकुमार त्रिशाला कुंभार (३६), श्रीदार श्रीशाल कुंभार (३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (८ महिने) व श्रीकांत रामकुमार चव्हाण (२६) अशी जखमीची नावे आहेत.

या अपघातात नवीन लग्न झालेले जोडपेदेखील होते. तर अपघाताचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या अपघाताची माहिती समजताच पांडे येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी धाव घेतल्याने जखमींना वेळेत उपचार मिळू शकले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in