धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

लांडेवाडीत अमानुष मारहाणीमुळे सोनापूरच्या युवकाचा मृत्यू: ९ मे रोजी झाली होती अमानुष मारहाण तर १८ रोजी रात्री झाला मृत्यू,मारहाण करणाऱ्या अज्ञात सहा जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल
मारहाणीत युवकाचा मृत्यू
मारहाणीत युवकाचा मृत्यूप्रातिनिधिक फोटो

विशेष प्रतिनिधी

कराड :  लांडेवाडी (वारणानगर,ता.सातारा) येथे गेल्या ९ मे रोजी मध्यरात्री अज्ञात पाच ते सहा जणांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे सोनापूर (ता.सातारा) येथील गणेश गोरख नावडकर हा गंभीर जखमी झाला होता,त्याच्यावरती सातारा येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचा शनि १८ रोजी रात्री मृत्यू झाला.गणेश हा गेले नऊ दिवस जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असतानाच मृत्यू झाल्याने गोरख रघुनाथ नावडकर यांनी या घटनेची माहिती बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.                                   

अर्धनग्न करून लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण...

मृत गणेश याचे लांडेवाडी येथील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते.पण याची घरच्यांना कल्पना नव्हती. त्याच मुलीच्या घरी ९ रोजी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमास गणेशला बोलवले होते. त्यावेळी तो घरी सांगुन लांडेवाडीला गेला होता. १० मे रोजी सकाळी गोरख नावडकर यांना मुलगा गणेश जखमी झाला असून त्यास सातारा येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजले. त्यावेळी गोरख नावडकर स्वतः त्याच्याकडे गेले होते. यादरम्यान त्यांनी मुलास काय झाले असे विचारले असता मला लांडेवाडी येथे पाच ते सहा जणांनी दोरीने झाडास बांधुन कातडी पट्टा, लाकडी दांडक्याने अर्धनग्न करून अमानुष मारहाण केल्याचे सांगितले. मारहाणीत गणेश याचा पाय फ्रॅक्चर झाला होता.

मारहाणीत अंतर्गत रक्तस्त्राव-

त्याचे ऑपरेशन झाले होते. परंतू मारहाणीत अंतर्गत रक्तस्त्रावामुळे पोट व छातीत दुखत असल्याचेही गणेश सांगत होता. त्यामुळे त्यास आय:सी.यु.मध्ये दाखल केले होते. १८ रोजी उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पोस्टमार्टेम करून गणेशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अंत्यविधीनंतर गोरख नावडकर यांनी लांडेवाडी येथील सहा जणांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयित सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.अधिक तपास बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र तेलतुंबडे करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in