शासनाच्या दुर्लक्षामुळेच नांदेडात मृत्यूचे तांडव ; माजी अभ्यागत मंडळाचा आरोप

वास्तूमध्ये घाणीचे साम्राज्य असून औषध पुरवठा, नर्सेस व डॉक्टरांचा स्टॉफ अत्यंत कमी असल्याचं देखील म्हटलं आहे.
शासनाच्या दुर्लक्षामुळेच नांदेडात मृत्यूचे तांडव ; माजी अभ्यागत मंडळाचा आरोप

नांदेड : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची भव्य वास्तू केवळ आता शोभेची बाहुली बनली आहे. या वास्तूमध्ये घाणीचे साम्राज्य असून औषध पुरवठा, नर्सेस व डॉक्टरांचा स्टॉफ अत्यंत कमी आहे. त्यामुळे रुग्णांची सुश्रुषा नीटनेटकी होत नाही. दुर्दैवाने या समस्यांची परिणती म्हणून ३१ रुग्णांना जीव गमवावा लागला. यात दोन दिवसांच्या आतील १२ बालकांचा समावेश आहे. नांदेडमध्ये झालेल्या मृत्यूचे हे तांडव शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे झाल्याचा गंभीर आरोप या भागातील स्थानिक आमदार व अभ्यागत मंडळाचे माजी अध्यक्ष आ. मोहनअण्णा हंबर्डे यांच्यासह माजी सदस्य संतोष पंडागळे, डॉ. करुणा जमदाडे, शेख लतिफ यांनी केला आहे.

२४ तासांत २४ रुग्ण मृत्यू, त्यानंतर त्यात आणखी ७ मृत्यूंची पडलेली भर, या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रुग्णालयास भेट दिली. महाविद्यालयातील भयाण वास्तवाची यानिमित्ताने माहिती उजेडात आली. वारंवार सांगूनसुद्धा शासनाकडून या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास आर्थिक मदत केली जात नाही. सिटीस्कॅन यासारख्या कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या अनेक मशीन केवळ शासनाने एएमसी अर्थात वार्षिक देखभाल निधी न दिल्यामुळे धूळखात पडून आहेत. या विषयी शासनास काही गांभीर्य नाही. मागील दीड वर्षांपासून या महाविद्यालयास पूर्ण वेळ अधिष्ठाता दिला नाही. प्रभारी राज सुरू आहे. प्राध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या केल्या आहेत. मोठ्या प्रमाणात नर्सेसचा तुटवडा आहे. यामुळेच या रुग्णालयातील रुग्णसेवा कमालीची ढासळल्याचा आरोप आ. मोहनअण्णा हंबर्डे, संतोष पांडागळे, डॉ. करुणा जमदाडे, शेख लतिफ यांनी केला आहे. अभ्यागत मंडळ निर्मितीनंतर कोविडच्या काळात केवळ दोन बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये एकाही बाबींची परिपूर्तता झाली नाही. त्यानंतर सत्तांतर झाले. परंतु नवीन अभ्यागत मंडळ दिले नाही किंवा जुन्या अभ्यागत मंडळ सदस्यांना हे मंडळ अस्तित्वात आहे किंवा नाही याची माहिती देखील दिली नसल्याचा खेद व्यक्त केला.

आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी रुग्णालयातील स्टॉफ, औषध पुरवठा, स्वच्छता या संदर्भात पालक मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना कमीत कमी २५ पत्र दिली. पालक मंत्र्यांसमोर सार्वजनिक भाषणामध्ये महाविद्यालयाच्या सुविधांकडे लक्ष पुरविण्याची मागणी केली. परंतु असे काहीच घडत नसल्याचा आरोप आ. हंबर्डे यांनी केला.

डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या निष्कलंक चारित्र्याचा धनी असलेल्या नेत्याच्या नावाने असलेल्या महाविद्यालयाचा दर्जा सुधारण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन शासनास भाग पाडावे, असेही माजी अभ्यागत मंडळाने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in