शरद पवार यांच्या पाठोपाठ संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; म्हणाले, "सकाळचा भोंगा..."

एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली.
शरद पवार यांच्या पाठोपाठ संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; म्हणाले, "सकाळचा भोंगा..."

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. "तुमचा दाभोळकर करु" अशी धमकी शरद पवार यांना देण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेत ज्या ट्विटर हँडलवरुन ही धमकी देण्यात आली, त्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्या ट्विटर हँडलची शहानिशा करुन त्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसा आयुक्तांना दिले. यानंतर पवारांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. तसंच त्यांच्या पुण्यातील घराबाहेर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

शरद पवार यांना आलेल्या धमकीपाठोपाठ ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत यांचे बंधू आणि भांडूप मतदार संघाचे आमदार सुनील राऊत यांना ही धमकी देण्यात आली. एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली. सुनील राऊत यांनी फोन उचलल्यावर त्यांना सकाळी 9 वाजेचा भोंगा बंद करा, अन्यथा महिनाभरात तु्म्हा दोघांनाही गोळ्या घालू अशी थेट धमकी अज्ञाताकडून संजय राऊत आणि सुनील राऊत यांना देण्यात आली आहे. यानंतर संजय राऊत यांनी तात्काळ मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली. तसंच त्यांनी आमच्या जीवाचं काही बरं वाईट व्हावं, हीच सरकारी इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी पोलिसांना माहिती देताना आपल्याला वारंवार धमक्या येत असून याबाबत चार वेळा गृहमंत्र्यांना कळवलं असल्याचं सांगितलं. तसंच एका गुंडाचे फोटो काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या चिरंजीवांसोबत झळकत आहेत. त्याने माझ्या हत्येचा कट रचल्याचे पुरावे देखील मी गृहमंत्रालयाकडे पाठवल्याचं त्यांनी सांगितलं. पण मी पाठवलेल्या पुराव्याबाबत काहीच कारवाई झाली नसल्याचं मला कळालं. उलट त्या गुंडालाच पोलीस संरक्षण दिलं आहे. असं राऊत म्हणाले.

या प्रकरणानंतर संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे सविस्तर माहिती पाठवली आहे. राज्यातील दोन महत्वाच्या नेत्यांना असं थेट जीवे मारण्याची धमकी आल्यानं राज्याच्या राजकारणाता खळबळ उडाली आहे. त्यामुळे गृहमंत्रायलाकडून या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in