

लासलगाव : कर्जबाजारीपणा, शेतीमालाला मिळणाऱ्या अत्यल्प भाव आणि कर्जबाजारीपणाच्या विवंचनेत बागलाण तालुक्यातील राहुड येथील गुलाब केशव निकम (५९) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
गुलाब निकम यांची तीन एकर शेती आहे. या शेतीवर पत्नी व तीन मुलांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेती व घरासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढत होता.
बदलत्या हवामानमुळे शेतीचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. यंदा त्यांनी कांदा पिकाची लागवड केली मात्र, परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला. उरलेला कांदा बाजारात विक्री केला असता मातीमोल भाव मिळाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली होती. कर्जाबरोबरच नातेवाईकांकडून घेतलेले हातउसने पैसे कसे फेडायचे, घरखर्च आणि तीन मुलांचे विवाह कसे करायचे या चिंतेत वाढते कर्ज आणि अपुरे उत्पन्न यामुळे ते मानसिक तणावाखाली होते, असे ग्रामस्थांनी सांगितले.
जनावरांना चारा टाकण्यासाठी ते रविवारी गावा शेजारील खळ्यात गेले होते. रात्री ते शेतातच थांबले मात्र सकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने मुलगा चेतन निकम हा खळ्याकडे गेला असता वडिलांनी गळफास घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती समजताच जायखेडाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तसेच तलाठी विष्णु गायकवाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.