महायुतीच्या जागावाटपाचा १० दिवसांत निर्णय; फडणवीस यांची माहिती

लवकरच महायुतीच्या घटक पक्षांशी चर्चा करून आम्ही आठ-दहा दिवसात जागावाटपाबाबत निर्णय घेऊ
महायुतीच्या जागावाटपाचा १० दिवसांत निर्णय; फडणवीस यांची माहिती

नागपूर : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला असून येत्या आठ ते दहा दिवसांत जागावाटपाचा निर्णय होईल, असे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे सांगितले. महायुतीत तीन प्रमुख पक्षांमध्ये जागांसाठी रस्सीखेच सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी जागावाटपाचा तिढा सुटू लागल्याचे संकेत यावेळी दिले.

नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली असली तरी त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे नसल्याने यासाठी महाराष्ट्रातील महायुतीतील मतभेद कारणीभूत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती. याबाबत पत्रकारांनी फडणवीसांना छेडले असता ते म्हणाले की, “ महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय अद्याप झाला नाही, केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यावेळी महाराष्ट्रातील जागेबाबत चर्चा झाली नव्हती. लवकरच महायुतीच्या घटक पक्षांशी चर्चा करून आम्ही आठ-दहा दिवसात जागावाटपाबाबत निर्णय घेऊ.”

नवनीत राणा आमच्या सहयोगी सदस्य

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले की, राणा आमच्या सहयोगी सदस्य आहेत. मागील पाच वर्षे त्यांनी लोकसभेत एनडीए व मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्या नागपूरमधील भाजयुमोच्या कार्यक्रमात सहभागी होत आहे. यात वेगळे काहीच नाही. त्या आमच्या सोबत राहतील.

logo
marathi.freepressjournal.in