१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आणखी लांबणीवर ; 'या' तारखेला होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत देखील याच दिवशी सुनावणी होणार असल्याची माहीती आहे.
१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आणखी लांबणीवर ; 'या' तारखेला होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Published on

राज्यात सुरु असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वादावर ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांना मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यास उशिर करत असल्याचं सांगत ठाकरे गटाकडून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली गेली होती. मात्र, आता ही सुनावणी लांबणीवर पडली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देवून दोन महिने उलटले तरी विधानसभा अध्यक्ष निर्णय देत नाहीत असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. विधानसभा अध्यक्षांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेवर मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. तरी देखील राहुल नार्वेकर जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे. मात्र, आता ही सुनावणी थेट दीड महिना लांबणीवर पडली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या १६ आमदारांच्या याचिकेवर १८ सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली जाणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयासाठी अजून दीड महिना वाट पहावी लागणार आहे. तोपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत देखील याच दिवशी सुनावणी होणार असल्याची माहीती आहे. यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटासाठी १८ सप्टेंबर हा दिवस महत्वाचा असणार आहे. आता ही सुनावणी लांबणीवर पडल्याने ठाकरे गटाला पुन्हा वाट पाहावी लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in