प्रचारगीतातील जय भवानीच्या वादावर लवकरच निर्णय; तुतारीबाबत आधीच आक्षेप घ्यायला हवा होता-निवडणूक आयोग

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल गीतातील ‘जय भवानी’ या शब्दाला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे.
प्रचारगीतातील जय भवानीच्या वादावर लवकरच निर्णय; तुतारीबाबत आधीच आक्षेप घ्यायला हवा होता-निवडणूक आयोग

प्रतिनिधी/मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल गीतातील ‘जय भवानी’ या शब्दाला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. या आक्षेपाबाबत पुनर्विचार करावा, असा अर्ज पक्षाने केला आहे. याबाबत दोन दिवसांत निर्णय देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली. तसेच बारामती मतदारसंघात तुतारी या शब्दाबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र त्यात ‘ट्रम्पेट’ हे मुक्त चिन्ह गेल्या अनेक वर्षांपासून वापरात आहे. एकदा मुक्त चिन्ह उमेदवाराला दिल्यानंतर त्यात बदल होऊ शकत नाही. आक्षेप घ्यायचाच होता तर तो आधीच घ्यायला हवा होता, असेही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.

शिवसेना ठाकरे गटाने जय भवानी हे मशाल गीत निवडणूक प्रचारासाठी तयार केले आहे. त्यात एक सेकंदासाठी जय भवानी हा शब्द येतो. त्या शब्दाला निवडणूक आयोगाने आक्षेप घेत नोटीस बजावली आहे. मात्र पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी निवडणूक आयोगाचा एक न्याय, आम्हाला एक न्याय असा आक्षेप घेत कोणत्याही परिस्थितीत आम्ही जय भवानी हा शब्द बदलणार नाही, अशी आव्हानात्मक भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्याबददल आता त्यांच्या पक्षाने आयोगाला पत्र दिले असून आक्षेपाबाबत पुनर्विचार करावा असे म्हटले आहे. अशा स्थितीत ४८ तासांत संबंधित पक्षाला आमच्याकडून उत्तर देण्यात येते, असे चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी जी उदाहरणे दिली आहेत, ती जाहीर प्रचारसभांमधील आहेत. त्यात जर आचारसंहिता भंग झाला असेल तर संबंधित अधिकारी निर्णय घेतात. जय भवानी हे प्रकरण प्रचारगीताचे आहे. प्रचारगीत वापरण्याआधी आयोगाच्या समितीचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. ठाकरे गटासह इतर ३९ प्रकरणांत देखील असे आक्षेप घेण्यात आले आहेत. संबंधितांनी त्यातील त्रुटी दूर केल्या आहेत.”

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस हे आहे. तर एका अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. मात्र या चिन्हाच्या मराठी भाषांतरात तुतारी असे लिहिण्यात आले आहे. त्याला सुप्रिया सुळे यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे. “ट्रम्पेट हे मुक्त चिन्ह आहे. आक्षेप घ्यायचाच असता तर तो चिन्ह वाटप होण्याच्या आधीच घ्यायला हवा होता. तसेच ही मुक्त चिन्ह काही आताच आलेली नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून आहेत. तसेच मराठी भाषांतर देखील खूप आधीच करण्यात आले आहे. तसेच मतदान करतेवेळी बॅलेट युनिटवर फक्त चिन्हच दिसतात, त्यांचे मराठी भाषांतर खाली दिलेले नसते,” असेही चोक्कलिंगम म्हणाले.

अमरावतीमध्ये मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू यांनी राडा केला होता. त्यावर चोक्कलिंगम म्हणाले की, “अशा परवानग्या देण्यासाठी वन विंडो सिस्टिम तयार करण्यात आली आहे. सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणा या माध्यमातून परवानगी देतात. हे मैदान जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येते, त्यांनी फक्त जिल्हा परिषदेची संमती घेतली होती.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in