मुलांच्या भवितव्यासाठी गावात फोन, टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय

मोहिते वडगावमध्ये रोज सायंकाळी बरोबर ७ वाजता ग्रामदेवतेच्या मंदिरात भोंगा वाजवला जातो.
मुलांच्या भवितव्यासाठी गावात फोन, टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय

मोबाइल आणि टीव्हीने गावोगावचे पारकट्टे संपुष्टात आले. कौटुंबिक स्वास्थ्यही बिघडत चालले आहे; शिवाय मुलांच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अभ्यासाच्या वेळेत मुले हातात मोबाइल घेऊन तरी बसतात किंवा टीव्हीपुढे तरी बसतात. यावर सांगली जिल्ह्यातील मोहिते वडगावच्या ग्रामस्थांनी नामी तोडगा शोधला आहे. रोज संध्याकाळी ७ ते ८.३० या वेळेत गावातील घरोघरचे टीव्ही आणि प्रत्येक व्यक्तीकडील मोबाइल फोन बंद ठेवण्याचा निर्णय गावाने घेतला आहे. सरपंच विजय मोहिते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात असून याला ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

मोहिते वडगावमध्ये रोज सायंकाळी बरोबर ७ वाजता ग्रामदेवतेच्या मंदिरात भोंगा वाजवला जातो. याबरोबर गावातील लोक आपले मोबाइल फोन, घरातील टीव्ही संच, कम्प्युटर, लॅपटॉप अशी उपकरणे बंद करतात. त्यानंतर दीड तासांनी बरोबर ८.३० वाजता पुन्हा भोंगा वाजतो आणि लोक आपले मोबाइल फोन, टीव्ही आणि अन्य उपकरणे सुरू करतात. सरपंच विजय मोहिते म्हणाले, ‘‘या दीड तासांच्या कालावधीत मुलांनी अभ्यास करावा, कौटुंबिक संवाद व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. दिवसातील चार ते पाच तास मुलांच्या हातात मोबाइल फोन असायचे. शाळा संपल्यानंतरही मुले हातात मोबाइल घेऊन बसतात. पालकांचा टीव्हीपुढील वेळही लॉकडाऊनच्या काळात वाढला.’’ ‘‘लॉकडाऊननंतर ज्यावेळी शाळा पुन्हा सुरू झाल्या, तेव्हा मुले आळशी झाल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. मुलांचा वाचनातील, लिखाणातील रस कमी झाला. शिवाय मुले खेळायला जाणेही जवळपास बंद झाले. शाळा सुटल्यावर मुले हातात मोबाइल घेऊन बसू लागली. ग्रामीण भागात मुलांसाठी घरात स्वतंत्र अभ्यासाची खोली नसते. त्यामुळे मी गावकऱ्यांपुढे ही योजना ठेवली.

सुरुवातीला लोकांना ही योजना पचनी पडणे अवघड जात होते. स्वातंत्र्यदिनी महिलांची ग्रामसभा घेतली आणि भोंगा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनंतर गावातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, निवृत्त शिक्षक यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली. याची आता फळे मिळत आहेत. लोकांना मोबाइल, टीव्ही बंद ठेवून मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याचे, कौटुंबिक संवाद साधण्याची आता सवय होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in