राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळे यांची मागणी

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेती पिकांचं मोठं नुकासान झालं आहे. तर सोयाबीन, कापूस सारख्या पिकांनी माना टाकल्या आहेत, असं वडेट्टीवार म्हणाले
राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ;  विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळे यांची मागणी

यंदा पावसाने सुरुवातीपासूनचं लपंडाव सुरु केला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र, यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा जाताना दिसत आहे. यामुळे खरीप पिके पुन्हा धोक्यात आली आहेत. तर भर वावसाळ्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. यावरुन सुप्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर मुसळधार पाऊस नसल्याने तसंच किडींना पोषक वातावरण असल्यानं पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. खरीप हंगाम वाया गेल्याचं चित्र निर्माण झाल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

१ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागात पावसाचं प्रमाण सरासरी पेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. ही परिस्थिती भीषण असून पीक हातातून निघून गेलं आहे. हे पाहता शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणं आवश्यक आहे. यासोबत महाराष्ट्र सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवारांनी देखील केली मागणी

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेती पिकांचं मोठं नुकासान झालं आहे. तर सोयाबीन, कापूस सारख्या पिकांनी माना टाकल्या आहेत. यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in